रेड हेलन हे पॅपीलिओनीडे कुळातील एक मोठे फुलपाखरू आहे. पॅपीलिओनीडे कुळातील फुलपाखरे ही स्व्ॉलोटेल म्हणजे शेपटीला टोक असलेली फुलपाखरे म्हणून ओळखली जातात.
रेड हेलन फुलपाखरू मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पुढच्या पंखावर पंखाच्या किनारीच्या समांतर पांढरे पट्टे असतात. हे पट्टे अगदीच फिकट असताता. त्यामुळे काळा रंग ‘फेड’ झाल्यासारखे दिसतात. रेड हेलनच्या मागच्या पंखाच्या खालच्या टोकाला चंद्रकोरीच्या आकाराची (मात्र उलटी) लाल रंगाची नक्षी असते. अशा या डिझाईनची एक रांग पंखांच्या कडेला असते. या रांगेच्या आतल्या बाजूला मोठे पांढऱ्या रंगाचे ठळक मोठे ठिपके दोन्ही पंखावर एक-एक असे असतात.
रेड हेलन नेहमी बसताना आपले पंख पसरून बसते. मागच्या पंखांवरचे मोठे पांढरे ठिपके पुढच्या पंखाखाली झाकलेले असतात. अधूनमधून किंवा संकटाची चाहूल लागल्यास रेड हेलन आपले पुढील पंख बाजूस सारून हे पांढरे ठिपके दिसतील अशा स्थितीत आणतो आणि मग भक्षकाची फसगत होते. अचानक दिसणाऱ्या पांढऱ्या ठिपक्यांना घाबरून भक्षक मागे हटतो.
रेड हेलन फुलपाखरू वर्षांवनांमध्ये किंवा भरपूर पावसाच्या प्रदेशात मार्चपासून नोव्हेंबपर्यंत म्हणजे पावसाळ्याच्या आधी, नंतर आणि पावसाळ्यात हमखास दिसते. त्यातही आपल्या महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीपासून डोंगर रंगांमध्ये ती थेट केरळच्या दक्षिण टोकापर्यंत कुठेही रेड हेलन बघायला मिळू शकते. शिवाय गाव किंवा शहरामधील बागांमध्ये मध प्यायला ही फुलपाखरे नेहमी येतात. शिवाय यांची हमखास दिसण्याची जागा म्हणजे पाणथळ जागा- जेथे इतर फुलपाखरांबरोबर ‘मड पेडलिंग’ करत ही निवांत बसलेली असतात.
रेड हेलन फुलपाखराची मादी सिट्स कुळातील विविध प्रकारच्या झाडांवर (उदा. लिंबू, बेल इत्यादी) तसेच जंगलात आढळणाऱ्या रानमिरी, चिरफल इत्यादी झाडांवर अंडी घालते. बाहेर येणारे सुरवंट याच झाडांची पाने खाऊन मोठे होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red helen butterfly