जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच बांधकामांना सुरुवात
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सरकारी जमिनींवर गृहसंकुलांच्या बांधकामांना नगररचना विभागाने परवानगी देण्यापूर्वी संबंधित विकासकाने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणणे बंधनकारक आहे. असे असताना काही विकासक केवळ हमीपत्राच्या आधारे बांधकाम परवानगी प्रमाणपत्र मिळवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील नगररचना विभागाचे अधिकारीही ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध नसताना बांधकाम परवानगी देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला अंधारात ठेऊन केवळ हमीपत्राच्या (अंडर टेकिंग) आधारे अशा प्रकारच्या बांधकाम परवानग्या मिळविण्यात येत असल्याने सरकारी जमिनींवर उभ्या रहाणाऱ्या गृहसंकुलांचे बांधकाम वादग्रस्त ठरण्याची भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या बांधकामांमध्ये भविष्यात काही त्रुटी काढून गृहसंकुलांच्या बांधकाम परवानग्या रद्द केल्या तर खरेदीदार अडचणीत येण्याची भीतीही व्यक्त होत आहे. विकासक, वास्तुविशारदांकडून कल्याण-डोंबिवलीत सर्रासपणे अशा परवानग्या पदरात पाडून घेतल्या जात आहेत. कल्याणमधील वाडेघरसारखा प्रकल्प अशाच गफलतींमुळे यापूर्वी वादात सापडला आहे. याप्रकरणी कल्याण, डोंबिवलीतील काही जागरूक नागरिकांनी महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांची भेट घेऊन असे प्रकार निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. १३ जानेवारी २०१३ रोजी नगररचना विभागाने अशा प्रकारची बांधकाम परवानगी एका विकासक, वास्तुविशारदाला दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा