कल्याण: तेरा वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेच्या सर्वसाधारण सभेने डोंबिवलीतील रेल्वे स्थानका जवळील विष्णुनगर मासळी बाजार इमारतीचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी तीन कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च पालिकेने प्रस्तावित केला होता. परंतु राजकीय कुरघोडीमुळे रखडलेल्या विष्णुनगर मासळी बाजाराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय अखेर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कामासाठीची निविदा प्रक्रिया आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सुरू केली आहे. मोक्याच्या जागेवर असलेल्या मासळी बाजाराच्या पुनर्विकासाचे काम आपल्या ठेकेदाराला मिळावे म्हणून पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच होती. या विषयावर आता पडदा पडला आहे. मासळी बाजाराची पडझड झाली असून येथील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.  डोंबिवली नगरपरिषदेच्या काळात विष्णुनगर मासळी बाजाराची उभारणी झाली. ४० वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीत आता सुविधा राहिल्या नाहीत. आहे त्या जागी सुसज्ज दोन माळ्याची इमारत बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा >>> रस्त्यावर खडी पसरल्याने डोंबिवलीतील घरडा सर्कल येथे दुचाकी स्वारांची घसरगुंडी

जीर्ण मासळी बाजाराची वास्तु सुसज्ज व्हावी म्हणून कडोंमपातील निवृत्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत, माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेनेचे नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे, मनसेचे माजी नगरसेवक दिलीप भोईर हे प्रयत्नशील होते. परंतु राजकीय कुरघोडीमुळे हा प्रस्ताव रखडला होता. वामन म्हात्रे यांना या बाजारातील गाळ्यांमध्ये त्यांचे हक्काचे गाळे मिळू नयेत यासाठी काही मंडळींचा डाव होता. माजी आमदार प्रकाश भोईर यांनी मत्स्य विकास महामंडळाकडून मासळी बाजारासाठी सुमारे तीन कोटीचा निधी आणला होता. शिवसेनेच्या नगरसेवकांनी कामाचे श्रेय आमदार भोईर यांना मिळेल म्हणून त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. दरम्यान, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे या मासळी बाजारासाठी प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनीही या वास्तु उभारणीला अनुकुलता दाखविली आहे. 

हेही वाचा >>> २८ हजार राख्या घेऊन डोंबिवलीतील तरुण दुचाकीवरुन कारगिलला

इमारतीमधील रचना

मासळी बाजारात एकूण ९२ गाळेधारक आहेत. याठिकाणी तळ अधिक दोन मजली इमारत उभारण्यात येणार असून याठिकाणी एकूण ९८१ चौ.मी. बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर रस्ता रुंदीकरणातील १२ गाळेधारक, २१ मासळी, १० मटण विक्रेते, पहिल्या माळ्यावर ३९ मासळी विक्रेते, १० मटण विक्रेते, शीतगृह, स्वच्छतागृह, दुसऱ्या माळ्यावर ४७ मासळी विक्रेते, शीतगृह, स्वच्छतागृह प्रस्तावित आहे. रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकचा पोहच रस्ता मासळी बाजाराच्या पहिल्या माळ्याला जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सात कोटी ४५ लाख खर्च प्रस्तावित आहे. एक ते दीड वर्षात हे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. मासळी बाजारातील विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर केल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.

“डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावरील विष्णुनगर मासळी बाजाराच्या जीर्ण झालेल्या वास्तुचा पुनर्विकास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विक्रेते, ग्राहक यांच्या सुविधांचा विचार करुन दोन माळ्याची सुसज्ज इमारत याठिकाणी प्रस्तावित आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.” –डाॅ. भाऊसाहेब दांगडे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redevelopment of vishnunagar fish market in dombivli after thirteen years ysh