|| भाग्यश्री प्रधान

पाच लाखांपर्यंतच्या तक्रारी निशुल्क; ग्राहकांना तक्रार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

फसवणूक झालेल्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय ग्राहक मंचाने घेतला आहे. पाच लाखांपर्यंतच्या तक्रारींसाठी जानेवारीपासून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पाच ते दहा लाखांपर्यंतच्या तक्रारीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात २०० तर १०-२० लाखांदरम्यानच्या तक्रारींसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करण्यासाठी १०० ते ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असे.

फसवणुकीला बळी पडलेल्या ग्राहकांनी त्याविरोधात आवाज उठवावा आणि अशा प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी ग्राहक मंचाकडे दाद मागावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहक मंचावरील कामाचा भार दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील अनेक शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांनाही मंचाने दणका दिला आहे. महाराष्ट्रात तक्रार दाखल करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आली आहे. मात्र इतर राज्यांत तक्रार नोंदविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याचे मंचाच्या अधिकाऱ्यांनी दिली. १९८६ मध्ये ग्राहक तक्रार निवारण मंचासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. तक्रार नोंदवताना तक्रारीचा सारांश, तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रांची यादी, वकीलपत्राबरोबरच तक्रार दाखल करण्यासाठी शुल्क भरावे लागते. मात्र, १९८६ मध्ये तयार करण्यात आलेल्या ९ (अ) या नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बदलामुळे तक्रारीच्या शुल्कात कपात करण्यात आली आहे. दारिद्रय़रेषेखालील तक्रारदारांकडून ग्राहक मंच एक लाखापर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क घेत नव्हते.

अधिकाधिक ग्राहकांनी तक्रार नोंदविण्यासाठी पुढे यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदी करताना विक्रेते, व्यावसायिकांकडून देयक पावती घेणे अनिवार्य असते. फसवणूक झाल्यास या पावतीद्वारे ग्राहक मंचात तक्रार करता येते.   – विलास पवार, प्रबंधक, मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच

 

Story img Loader