डोंबिवली : एकूण १५ गुन्हे दाखल असलेला डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील रील स्टार आणि विकासक सुरेंद्र पाटील यांचा मुक्काम मानपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. गुरुवारपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे. सुरेंद्र यांच्या वाहनाचा चालक फरार आहे. तोही लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्याला पकडण्यासाठा मानपाडा पोलीस ठाण्याची तपास पथके विविध भागात त्याचा शोध घेत आहेत.

ऐषआरामी जीव जगणाऱ्या सुरेंद्र पाटील यांना पोलीस ठाण्यातील नियमाप्रमाणे आरोपींना जे भोजन दिले जाते तेच दिले जात आहे. त्याची घरचे भोजन किंवा इतर कोणतीही बडदास्त केली जात नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरेंद्र पाटील यांच्या जवळ परवानाधारी रिव्हाॅल्व्हर आहे. ते रिव्हाॅल्व्हर त्यांच्या वाहन चालकाजवळ आहे. वाहन चालक फरार असल्याने पोलिसांना ते अद्याप ताब्यात घेता आले नाही. नाशिक भागातील मूळ निवासी असलेली एक तरूणी पुणे येथे नोकरी करते. या तरूणीची इन्स्टाग्रामवरून ओळख करून सुरेंद्र पाटील यांनी या तरूणीला मुंबई विमानतळावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. या तरूणीला डोंबिवली ठाकुर्लीत बोलावून घेतले होते. ही तरूणी सुरेंद्र पाटील यांच्या कार्यालयात आल्यावर सुरेंद्र यांनी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. तिच्या आई, वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती.

दुसऱ्या फेरीला तरूणी पुन्हा सुरेंद्र पाटील यांच्या भेटीसाठी आली होती. त्यावेळीही त्यांनी तरूणीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला होता. ही तरूणी कार्यालयातून बाहेर पडत होती. त्यावेळी सुरेंद्र पाटील यांच्या वाहन चालकाने तिचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केले होते. याप्रकरणी तरूणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी लैंगिक अत्याचार, शस्त्र कायद्याने सुरेंद्र व त्यांच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आपण घरातच आहोत. आपण असे काही केले नाही, असे माध्यमांना सांगणारे सुरेंद्र पाटील फरार झाले होते. ठाणे खंडणी विरोधी पथकाने त्यांना नाशिक येथील एका हाॅटेलमधून अटक केली होती. त्यांचा ताबा मानपाडा पोलिसांना दिला आहे. सुरेंद्र यांचा वाहन चालक अधिक चौकशीसाठी ताब्यात घेणे आवश्यक असल्याने पोलीस त्या फरार चालकाचा शोध घेत आहेत.

हा तपास सुरू असतानाच, रामनगर पोलीस ठाण्यात एका २९ वर्षाच्या नोकरदार महिलेने सुरेंद्र यांच्या विरुध्द लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. या दोन्ही गुुन्ह्यांचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत. त्याच बरोबर या गुन्ह्यातील सहगुन्हेगार सुरेंद्रचा चालक सापडत नाही तोपर्यंत महत्वाची माहिती आणि महिलेला धमकाविण्यासाठी वापरलेले रिव्हाॅल्व्हर जप्त करता येत नाही. त्यामुळे पोलीस चालकाच्या मागावर आहेत. पोलीस सुरेंद्र विरुध्द कठोर कारवाईसाठी प्रयत्नशील आहेत. सुरेंद्र पाटील याची चौकशी केली जात आहे. त्याच्या साथीदार चालकाचा शोध घेतला जात आहे. गुरुवारपर्यंत सुरेंद्र पाटीलला पोलीस कोठडी आहे. विजय कादबाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे.