ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात. त्याठिकाणांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर २०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात वाहतुक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) भरारी पथके संबंधित ठिकाणी तैनात करण्यात आले. पथके तैनात केल्यानंतर २०२३ च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये घट झाल्याचा दावा ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केला.
रस्ता सुरक्षा अभियानाबाबतची माहिती देण्यासाठी गुरुवारी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओ विभागाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे वाहतुक पोलीस, आरटीओ आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका संस्थेने अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती गोळा केली होती. यामध्ये संबंधित क्षेत्रात अपघातांच्या वेळा, त्रुटी याबाबतची माहितीचा यामध्ये सामावेश होता. डिसेंबर महिन्यात आरटीओचे भरारी पथक आणि ठाणे वाहतुक पोलिसांचे पथक त्याठिकाणी तैनात करण्यात आले. त्यामुळे डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाली अशी माहिती पाटील यांनी दिली. तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी विजयकुमार कट्टी यांच्या ‘ग्रँडमा रोहिणी स्टोरी ऑन रोड सेफ्टी’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.