ठाणे: ठाण्यात कोट्यवधी रुपयांच्या वाहनांची विक्री मोठ्याप्रमाणात वाढली आहे. ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ठाणे, भिवंडी आणि मिरा भाईंदर शहरात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या ८५ मोटारींची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक महागडी मोटार मॅक्लाॅरेन या कंपनीची असून तिची किमंत तब्बल ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. त्यापाठोपाठ ७ कोटी ४९ लाख ५० हजार रुपये आणि ६ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या फेरारी कंपनीच्या मोटारींचा सामावेश आहे. वाहन खरेदी करणाऱ्यांमध्ये व्यवसायिकांचा आणि राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींचा सामावेश आहे.
आलिशान वाहनांबद्दल असलेले आकर्षण, ठाण्यात मोठ्याप्रमाणात बांधकाम वाढल्याने तसेच अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये ठाण्यात आहेत. तर काहीजण हौसेखातर आलिशान वाहने खरेदी करतात. त्यामुळे या वाहनांची नोंदणी अधिक असल्याचे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ठाणे शहरात व्यवसायिक, राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील अनेकजण राहतात. त्यामुळे मध्यवर्गीयांप्रमाणेच धनाढ्यांचेही शहरात वास्तव्य आहे. ठाणे उपप्रादेशिक विभागांतर्गत ठाणे, भिवंडी, मिरा भाईंदर आणि ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाचे क्षेत्र येते. दरवर्षी या क्षेत्रात सुमारे १५ ते २० हजार मोटारींची नोंदणी होते. आता यामध्ये आलिशान मोटारीच्या नोंदणी देखील वाढू लागली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत १ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ८५ मोटारींची नोंदणी झाली आहे. ठाण्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी असलेल्या महागड्या मोटारीच्या नोंदणीमध्ये मॅक्लाॅरेन ‘७६५ एलटी स्पायडर’ या मोटारीचा सामावेश असून तिची किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. त्यापाठोपाठ ७ कोटी ४९ लाख ५० हजार रुपये आणि ६ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपये किमतीच्या फेरारी कंपनीच्या प्रत्येकी दोन मोटारींचा सामावेश आहे. तर ५० लाख ते ९९ लाख रुपयांवरील मोटारींची संख्या २०८ इतकी आहे.
हेही वाचा… उद्धव ठाकरे शनिवारी कल्याणच्या दौऱ्यावर; कल्याण लोकसभा तयारीचा आढावा
कोटी रुपयांच्या आलिशान मोटारींमध्ये मर्सिडीज आणि बीएमडब्यु या मोटारींना अधिक पंसती असून त्यांची नोंदणी अधिक आहे. मोटारींच्या नोंदी प्रामुख्याने व्यवसायिक किंवा त्यांच्या व्यवसायाच्या नावाने आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि राजकीय व्यक्तींच्या नावाने देखील अनेक आलिशान वाहनांची नोंदणी झाली आहे. २०२२ मध्ये आलिशान मोटारींच्या नोंदणीचे प्रमाणही अधिक होते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत एक कोटी रुपयांहून अधिक रुपयांच्या ३९ वाहनांची नोंदणी झाली होती.
ठाणे शहरात बांधकाम व्यवसाय वाढीस आले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिक ठाण्यात राहतात. मुंबईपेक्षा ठाण्यात कमी दरात कंपन्यांसाठी जागा उपलब्ध होत असल्याने अनेक व्यवसायाची कार्यालये ठाण्यात थाटली आहेत. त्यामुळे आलिशान वाहनांची नोंदणी ठाण्यात होऊ लागली आहे. तर काहीजण हौस आणि राहणीमानाचा दर्जा राखण्यासाठी देखील आलिशान वाहने खरेदी करत आहेत. – डाॅ. शंकर विश्वनाथ, वाहतुक तज्ज्ञ.
या १० महागड्या मोटारींची नोंदणी ठाण्यात
मोटार – किंमत
१) मॅक्लाॅरेन ‘७६५ एलटी स्पायडर’- ८ कोटी ९० लाख
२) फेरारी – ७ कोटी ४९ लाख ५० हजार
३) फेरारी- ६ कोटी ९८ लाख ९२ हजार
४) फेरारी- ५ कोटी २५ लाख २० हजार
५) फेरारी – ५ कोटी २४ लाख १९ हजार
६) लॅम्बोर्गिनी- ४ कोटी ६० लाख ९१ हजार
७) फेरारी – ३ कोटी ९० लाख
८) मसेराटी- ३ कोटी ८५ लाख ६४ हजार
९) पोर्शे- ३ कोटी २५ लाख
१०) जॅग्वार – ३ कोटी २० लाख