कल्याण : राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी शासनाने महास्वयंम पोर्टल सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांंपासून या पोर्टलचा सर्व्हर संथगती असल्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. याविषयीच्या अनेक तक्रारी ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, भिवंडी परिसरातील तरुणांकडून करण्यात येत आहेत.
महास्वयंम पोर्टलवर तत्काळ सुशिक्षित बेरोजगारांना नोंदणी करणे शक्य होत नाही, अशा अनेक तक्रारी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी, उद्योजक, प्रशिक्षक गटांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडे केल्या आहेत. उपलब्ध नोकऱ्या, उद्योजकतेमधील संधी यांचे सम आकलन करून त्याप्रमाणे लाभार्थींना माहिती देण्याचे काम, रोजगार संधी, तरुणांमधील कौशल्ये विकसित करून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, हे काम या पोर्टलच्या माध्यमातून केले जाते. केंद्र, राज्य शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण, परिपूर्णतेनंतर कर्ज, उद्योजकतेच्या संधी यांची माहिती या पोर्टलवर आहे. हे पोर्टल कधी बंद तर कधी संथगतीने सुरु असते, अशा तक्रारी लाभार्थींनी कौशल्य विभागाकडे केल्या आहेत. या विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे तरुणांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मोहिमेत सहभागी असलेल्या राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय यंत्रणांना एकत्रित आणून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवउद्यमशीलता विभागाकडून महास्वयंम पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील गावांमधील अनेक पदवीधर, बेरोजगार तरुण या पोर्टलवर नोंदणीसाठी दररोज तालुक्याच्या ठिकाणी येतात. महास्वयंम पोर्टल बंद असल्याने तासनतास सायबर कॅफेत थांबून तरुण निघून जात आहेत. दररोजचा प्रवास खर्च, त्यात नोंदणीचे काम होत नसल्याने अनेक तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद असतो. महास्वयंम पोर्टल बंद, त्यात वीज पुरवठा नाही त्यामुळे तरुणांची दुहेरी कोंडी होत आहे.
महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करताना आधार कार्ड संलग्न मोबाईलवर एक ओटीपी येतो. तो ओटीपी ऑनलाईन नोंदणी रकान्यात भरला की पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया गतिमान होते. पोर्टलचा सर्व्हर कधी बंद तर कधी संथगती असल्याने ग्रामीण भागातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास विभागाकडे संपर्क साधल्यावर सर्व्हर पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. लवकरच तरुणांना या पोर्टलवर नोंदणी करता येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा शहापूर येथे जातो. पण तेथे पोर्टल बंद असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे नोंदणी होत नाही. आणि प्रवास खर्चाचा बोजा पडतो. शासनाने ही समस्या लवकर सोडवावी. – यशवंत बेलसरे, सुशिक्षित बेरोजगार, शहापूर.