ठाणे – बेपत्ता झालेली, गैर प्रकारात अडकलेली, बालकामगार, निराधार मुलांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरु केलेल्या चाईल्ड हेल्पलाईनद्वारे ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने ४२ मुलांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे निराधार, गरजू, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. यामध्ये विभागामार्फत प्रत्येक शहरात सर्वेक्षण करत अशा मुलांचा शोध घेतला जातो. यांनतर त्यांची नोंदणी करून त्यांना विविध योजनांचा लाभ देत त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. यामध्ये मुलांचे पुनर्वसन तर होते. परंतु त्यासाठी मोठा कालावधी लागतो. दुसरीकडे बेपत्ता झालेली मुले, अनेक कारणांमुळे घर सोडून आलेली अल्पवयीन मुले, काही गैर प्रकारात अडकलेली मुले, बालकामगार यांची माहिती मिळताच त्यांच्या सुटकेसाठी आणि मदतीसाठी तत्काळ उपयोजना राबविण्याची गरज असते. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून चाईल्ड लाईन मदत सेवा चालविण्यात येत होती. या मार्फत अनेक गरजू मुलांना मदत करण्यात येते. याचा अधिक विस्तार व्हावा आणि सबंधित विभगातील मुलांना तातडीने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने मिशन वात्सल्य अंतर्गत चाईल्ड हेल्पलाईन – ११२ ही सेवा सुरू केली आहे.

हेही वाचा – ठाणे : गृहसंकुलातील गरबा प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद

ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागातर्फे याद्वारे विविध प्रकरणांतील मुलांची सुटका करण्यात आली आहे तर अनेक मुलांना मदतीचा हात दिला आहे. मागील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत ४२ मुलांना मदत करण्यात आली असून त्यांच्या पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

  • ठाणे सिटी चाईल्ड लाईन माध्यमातून १५ मुलांना मदत करण्यात आली आहे. यामध्ये ७ मुली आणि ८ मुलांचा समावेश आहे. यामध्ये मारहाण, बालकामगार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत इत्यादी प्रकरणांचा समावेश आहे.
  • ठाणे रेल्वे चाईल्ड लाईन माध्यमातून १३ मुलांना मदत करण्यात आली आहे. यामध्ये ५ मुली आणि ८ मुलांचा समावेश आहे. यामध्ये भिक्षेकरी आणि बेवारस स्थितीत आढळलेल्या बालकांचा समावेश आहे.
  • कल्याण रेल्वे चाईल्ड लाईन माध्यमातून १४ मुलांना मदत करण्यात आली आहे. यामध्ये ४ मुली आणि १० मुलांचा समावेश आहे. यामध्ये भिक्षेकरी आणि बेवारस स्थितीत आढळलेल्या बालकांचा समावेश आहे.

हेही वाचा – अंबरनाथमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, प्रकाशनगर भागात पहिल्या प्रकल्पासाठी हालचाली, पहिली बैठक सकारात्मक

चाईल्ड लाईनच्या माध्यमातून या मुलांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशी काही प्रकरणे असल्यास नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन – ११२ वर संपर्क साधावा. – रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, ठाणे</p>

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rehabilitation of 42 children in one month performance of district women child development department ssb