ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून विद्युत पुरवठा खंडीत होऊन पोखरण रोड येथील लघु उद्योजकांना मोठा फटका बसत होता. अखेर विद्युत पुरवठ्याबाबत लघु उद्योजकांची चिंता मिटली आहे. महावितरण कंपनीने येथील उच्च आणि लघु दाब वाहिन्या भूमिगत केल्या असून नव्याने रोहित्र बसविले आहे. तसेच उद्योगासाठी स्वतंत्र विद्युत वाहिन्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता येथील उद्योजकांना त्यांचा व्यवसाय विना अडथळा करणे शक्य होणार आहे.
पोखरण रोड येथील उपवन भागात १ हजार २०० लघु उद्योजकांचे कारखाने आहेत. दरवर्षी येथील लघु उद्योगांमधून १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यातील बहुतांश कारखाने अभियांत्रिकी स्वरूपातील आहे. तसेच १० ते १५ हजार कामगार, मजूरांना याठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होतो. काही लघु उद्योगांमधून मोठ्या कंपन्यांनाही यंत्र उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे येथील कारखाने अत्यंत महत्त्वाचे आहे. असे असले तरी येथील उद्योजकांना विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. येथील विद्युत वाहिन्या ओव्हरहेड स्वरूपात होत्या. त्यामुळे पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत होते. तसेच ज्या रोहित्रामधून येऊर भागातील रहिवाशांना विद्युत पुरवठा होतो. त्याच रोहित्रामधून येथील कारखान्यांनाही विद्युत पुरवठा केला जात होता. त्यामुळे अनेकदा विद्युत वाहिनींवर दाब येत होता.
हेही वाचा >>>राम मंदिरात विशेष दर्शन, देणगीच्या नावाने होऊ शकते फसवणूक; पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन
यासंदर्भात येथील पोखरण लेक स्माॅल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या लघु उद्योजकांच्या संघटनेने जिल्हा उद्योग केंद्र तसेच महावितरणकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर संघटनेच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. महावितरण कंपनीने या ठिकाणी नव्याने रोहित्र बसविले आहेत. त्यामुळे आता एका रोहित्रावरील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास तो दुसऱ्या रोहित्रावर वळविता येणे शक्य होणार आहे. येथील विद्युत वाहिन्या भूमीगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यासाठी आम्ही महावितरणकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. नव्या रोहित्रामुळे आता उद्योगालाही चालना मिळणार आहे. – हरिश तिवारी, उपाध्यक्ष, पोखरण लेक स्माॅल स्केल इंडस्ट्रीज् असोसिएशन.