प्रतिवर्षी माघ शुद्ध चतुर्थी किंवा भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी घरोघरी गणेश पूजनाचा सोहळा साजरा होत असतो. अर्थात माघी गणपती पूजा करणाऱ्यांचे प्रमाण तसे कमी आहे. श्रीगणेशपूजा करण्याचा प्रघात फार प्राचीन काळापासून रूढ आहे. मृत्तिकेची गणेश प्रतिमा तयार करून तिची विधिवत पूजा-अर्चा करणे असे त्या पूजेचे सोपे साधे स्वरूप होते. पूजनानंतर त्या प्रतिमेचे विसर्जन करणे अशी रूढी होती. मी चवथी-पाचवीत शिकत असतानाची एक आठवण आहे. तेव्हा आमचे शेजारी राहणारे अय्यंगार नामक एक दाक्षिणात्य गृहस्थ होते. ते माघ महिन्यात महिनाभर घर गणेशपूजन करीत. त्यासाठी त्यांना दरदिवशी गणपतीची नवी मूर्ती हवी असे. सकाळी पूजा-अर्चा आणि संध्याकाळी घरामागील विहिरीत विसर्जन असा त्यांचा महिन्याभराचा रोजचा क्रम असे. आमचे शेजारी असेपर्यंत मी प्रतिवर्षी त्यांना ती मूर्ती मला जशी जमेल तशी बनवून देत असे. रोज नवीन नवीन खाऊ ते मला देत. त्याच काळातली दुसरीही एक आठवण सांगण्यासारखी आहे. त्या काळात गणपतीची पूजा सांगायला भटजी कमी पडत. निदान खेडय़ापाडय़ात तरी तशी स्थिती होती. माझे काका ठाणा- (भिवंडी मार्गावर ठाण्यापासून जवळच असलेल्या गुंदवली नावाच्या खेडय़ात राहत असत. त्या गावातील बहुसंख्य खेडूतांच्या घरी गणपतीची पूजा-अर्चा होत असे. ठाण्यातून भटजी जायला तयार नसत. म्हणून काका त्यांच्या मदतीला त्यांच्या दोन मुलांना आणि मला गणपतीच्या दिवसांत गुंदवलीला घेऊन जात. रोज सकाळ-संध्याकाळ ही खेडूत मंडळी आम्हा तिघांना खांद्यावर बसवून आपापल्या घरी घेऊन जात आणि स्वत:च्या घरची पूजा संपली की पुढील घरी सोडून देत. त्या वेळी या तीन ‘बामनां’ना फळफळावळ आणि मिठाईचा भरपूर खाऊ मिळे. वरील दोन्ही उदाहरणांचे महत्त्व आजमितीलाही पूर्वीइतकेच कायम आहे. म्हणून त्यांचा येथे उल्लेख केला.
गणेश पूजेच्या काळात गौरीचे आगमन आणि पूजा हाही एक महत्त्वाचा भाग असे. आमच्या घरी खडय़ांच्या गौरी पूजत असत. काही ठिकाणी गौरीच्या मूर्ती किंवा मुखवटे पूजले जात. गणपती-गौरींच्या पूजेसाठी आम्हा मुलांवर मोठेच काम सोपविले जायचे. आजूबाजूच्या परिसरात उगवलेल्या नैसर्गिकरीत्या फुले (कण्हेरी, करदळ, बिट्टी, गोकरणी, चाफा, पारिजातक इ.) गोळा करणे, २१/२१ दुर्वाच्या जुडय़ा करून बांधणे, सहस्रावर्तनासाठी एक दिवस वेगळ्या दुर्वा काढणे, अशी कामे करताना घरातल्या मुला-मुलींच्या आपापसात स्पर्धा लागत असत. मग आई-बाबांनी त्यांचे कौतुक केल्यावर अंगावर मूठभर मास चढे. गणपती बाप्पाचा आता नक्की आशीर्वाद मिळेल या विश्वासाने मन आनंदून जाई. (सर्व काही दुकानातून आणायचे ही कल्पना) त्यानंतर काही दशके उलटल्यानंतर आज जन्माला आली.
आमच्या मो. ह. विद्यालयात ‘शाळेचा गणपती’ कित्येक वर्षे आणला जात होता. शाळेतले शिक्षकच कोणीतरी भटजींची भूमिका पार पाडत. त्यांच्या मदतीला आम्ही मुले-मुली असायचो. आमचे परांजपे सर आमच्याकडून आरत्या तर म्हणून घ्यायचेच, तसेच कित्येकांना गणपती अथर्वशीर्ष म्हणायला लावायचे. गणपती विसर्जनाच्या दिवशी गोविंदराव सामंतसर इच्छुक विद्यार्थ्यांना ठाणे खाडीवरील कळवा पुलावर घेऊन जात असत आणि शिस्तीने परत घेऊन येत. त्या वेळचा एक प्रसंग मला आजही आठवतो. शहरातल्या मोठय़ा आकाराच्या गणेश मूर्ती खाडीच्या पाण्यालगत नेण्यासाठी एक गणेश घाट बांधलेला होता. (आजही तो तेथे आहे.) हा सर्व देखावा आम्हाला दिसावा म्हणून सामंतसर पुलावरील एका मोक्याच्या जागी आम्हाला घेऊन जात. त्या वर्षी आमच्या शाळेतला आव्हाड नावाचा एक मोठवड विद्यार्थी त्या घाटावरून खाडीच्या पाण्यात उतरला. मात्र थोडय़ा वेळाने पोहत पोहत खाडीचे पात्र पार करण्याच्या प्रयत्नात) तो गटांगळ्या खाऊ लागला. महतप्रयासाने आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवला.
सार्वजनिक गणेशोत्सव ठाण्यात त्याकाळी किमान चार-पाच ठिकाणी होत असत. त्यापैकी चेंदणी- कोळीवाडा, आर्य क्रीडामंडळ, उमा नीळकंठ व्यायाम शाळा, पोलीस लाइन ही ठिकाणे अजून आठवतात. या ठिकाणी गणेशोत्सवाचे कार्यक्रम म्हणून नामवंत वक्त्यांची व्याख्याने, पी. सी. सरकार यांचे जादूचे प्रयोग, संगीत, क्वचित प्रसंगी नाटके, काव्यवाचन/ गायन, परिसंवाद असे चांगले चांगले कार्यक्रम होत असत. आचार्य अत्र्यांचे एक व्याख्यान मी अशाच एका कार्यक्रमात ऐकल्याचे स्मरते. मंगेश पाडगावकर- वसंत बापट- विंदा करंदीकर या त्रयीचे काव्यगायन म्हणजे मेजवानी असायची.
लोकमान्य टिळकांनी जनजागृतीच्या कार्यासाठी गणेशोत्सवाच्या प्रथेचा उपयोग करून घेतला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीत (१८९३) मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपती बसवला गेला. त्यानंतर ही प्रथा झपाटय़ाने शहराशहरातून पसरली. सुरुवातीच्या काळात त्याचा निश्चितच चांगला उपयोग झाला. गेल्या दोन-तीन दशकात मात्र ही प्रथा मूळ हेतूपासून हळूहळू दूर जाऊ लागली असे जाणवते. गेली सात दशके ठाण्यातला एक रहिवासी या नात्याने ठाणे शहरात या बाबतीत होत गेलेला बदल मला प्रकर्षांने जाणवतो.
श्री गणेशाची प्रतिमाच इतकी भावणारी आणि भुरळ घालणारी आहे की, गणेशपूजनाचे वेड गेल्या अर्धशतकात फार वेगाने पसरत गेले असे जाणवते. सत्त्व, रज व तम या त्रिगुणांचा अधिपती असलेला हा गुणेश (गणेश नव्हे) प्रणवस्वरूप असल्याचे गणेशपुराणाच्या १२ व्या अध्यायात विस्ताराने सांगितले आहे. श्रीगणेशाचे स्वरूप विशेषत: बालगोपाळ मंडळींना फार फार भावते. त्यामुळेच घरोघरी गणपती पूजण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यात काही वावगे नाही आणि चिंता वाटण्याचेही कारण नाही. चिंता वाटते ती दुसऱ्याच काही बाबींची!
श्रीगणेशरायाच्या घरगुती सोहळ्याचे अलीकडच्या काही वर्षांत फार झपाटय़ाने ‘सार्वजनिक गणपतीत’ परिवर्तन होत आहे. गणपती उत्सवाची प्रथा आपल्या मूळ ध्येयापासून दूरदूर चालली आहे, की काय, अशी भीती वाटते. मनोरंजन- लोकशिक्षण- समाजपोषी अशी मूळ कल्पना लोप पाऊन आज या प्रथेचे वेगळ्या अर्थाने राजकीयीकरण होत आहे. याविषयी काही अधिक लिहिण्याचे अर्थातच येथए प्रयोजनही नाही.
गणपती बाप्पांना निरोप देताना, घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या मिरवणुका निघतात. मार्गक्रमण करीत असताना या मिरवणुका अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण करतात.
मिरवणुका म्हटल्या की, त्यात घोषणा आल्या. त्यात पुढे फटाक्यांच्या आतषबाजी आणि कडकडणारे ताशे आणि बॅण्ड यांची भर पडली. हे नवेनवे संकेत खरे तर इतके तापदायक ठरत आहेत की, पंचक्रोशीतल्या रहिवाशांना आणि परिसरातील मुक्या प्राण्यांना जीवन असह्य़ वाटावे. कुत्र्या-मांजरांसारखे पाळीव प्राणी आणि आसमंतातले पक्षी या कर्णकर्कश आवाजानी भयभीत तर होतातच, पण त्यांचे मानसिक संतुलनही बिघडते. रस्त्यावरील हे असहाय प्राणी जिवाच्या आकांताने एक तर सैरावैरा पळत राहतात किंवा धडधडत्या छातीने आणि कंपायमान अवस्थेत सैरावैरा पळत सुटतात किंवा धडधडत्या छातीने कोठेतरी निपचित पडून राहतात. त्यांना आवरणे वा त्यांचे सांत्वन करणे घरच्या लोकांना केवळ अशक्यप्राय होऊन बसते. ठाण्यासारख्या महानगरात रस्त्यांवर रात्रभर जळणारे भगभगीत दिवे असतात. त्यामुळे काळ-वेळ यांचे भान नसणाऱ्या या मिरवणुकांच्या शिस्तीला कसलीच भयभीती राहत नाही. मिरवणुकांचा हा कलकलाट (फार सौम्य वर्णन?) कधी नव्हे इतक्या रात्री उशिरापर्यंत चालू राहतो.
या विसर्जनमुळे जलप्रदूषण ही आणखी एक गंभीर समस्या निर्माण होते. नगराच्या अवती-भवती असलेल्या सार्वजनिक जलाशयांचे पाणी कमालीचे प्रदूषित होते. तळी-तलाव, खाडी-नदी या सर्वाचे पाणी मोठय़ा प्रमाणावर दूषित होते. मूर्ती बनविण्यासाठी वापरलेले रासायनिक रंग, प्लॅस्टर ऑफ परिस (किंवा अन्य मातीही) हे सरळ सरळ पाण्यात विरघळतात आणि प्रचंड प्रमाणात प्रदूषण घडवून आणतात. अलीकडे ठाण्यासारख्या काही शहरात तात्पुरता कृत्रिम तलाव निर्माण करून त्या पाण्यात गणेश प्रतिमेचे विसर्जन करण्याचे नागरिकांना आवाहन केले जाते; परंतु या सोयीचा अजूनही पुरेपूर लाभ घेतला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. रासायनिक रंग आणि मखर करण्यासाठी वापरलेले थर्मोकोल, प्लास्टिक इत्यादींमुळे होणारे नैसर्गिक जलाशयांचे प्रदूषण अजून होत आहे.
अशा प्रदूषणावर काही जागरूक लोकांनी अलीकडे एका नव्या पद्धतीचा अवलंब करण्याची सुरुवात केली आहे. आता शाडूच्या मातीऐवजी त्यांनी धातूची गणेशमूर्ती उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे. विसर्जनाच्या दिवशी, घरात उत्सवकाळात वापरलेली ही धातूमूर्ती अंगणात नेली जाते व झाडांच्या सान्निध्यात त्या मूर्तीचे एका मोठय़ा बादलीतील पाण्यात विसर्जन केले जाते. मग ती गणेश प्रतिमा वस्त्राने पुसून कोरडी केली जाते व पुनरपी पुढील वर्षी ती वापरली जाते. त्यामुळे जलप्रदूषण नाही की ध्वनिप्रदूषण नाही. अशा जागरूक लोकांची जमात दिवसेंदिवस वाढत जावी ही गणेश चरणी प्रार्थना!    ’
अरुण जोशी

Story img Loader