तुळजापुरातील एकलव्य विद्यासंकुलाच्या विद्यार्थ्यांची किमया
वाढते रस्ते अपघात विचारात घेऊन तुळजापूर येथील यमगरवाडीतील एकलव्य विद्यासंकुलाच्या विद्यार्थ्यांनी अपघात टाळणारी ‘री-मूव्ह’ (चेसिस पाठीमागे येणारी) कार तयार केली आहे. या कारचे प्रात्यक्षिक डोंबिवलीत आयोजित विज्ञान संमेलनात दाखवण्यात आले. कार तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी कौतुक केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथील यमगरवाडी या दुर्गम भागात भटके विमुक्त विकास संस्थेतर्फे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य विद्यासंकुल चालवले जाते. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण शाळेतून मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळेतील आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांनी वाढते रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करून रस्ते अपघात टाळून जीव वाचवणारी कार तयार करण्याचा निर्णय घेतला. या कारचे प्रथम संकल्प चित्र तयार करण्यात आले. शिक्षक दयानंद भडंगे, बालाजी क्षीरसागर, यशवंत निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी साहाय्य केले. चारचाकी कारला अपघात झाला की गाडीतील प्रवासी अपघातात मरण पावतात. रिमूव्ह कारमध्ये गाडी जोराने समोरच्या वाहनावर आदळली की गाडीची चेसीस (पृष्ठाचा भाग) गाडीतील प्रवाशांसह वेगाने मागे येईल. अपघातात गाडीचे नुकसान झाले तरी वाहनातील प्रवाशांचे जीव वाचतील. लोखंडी साहित्य वापरून सध्या एक फूट लांबीचे प्रात्यक्षिकासाठी वाहन तयार करण्यात आले आहे.
‘रिमूव्ह’ कार
मोठय़ा चारचाकी कारचे सगळे भाग पृष्ठभागाकडून (चेसिस) एकमेकांना जोडलेले असतात. त्यामुळे वाहन एकदा समोरच्या वाहनावर आपटले की वाहनाचा चेंदामेंदा होतो. प्रवासी जीव गमावतात. ‘रिमूव्ह’ कारमध्ये कारचा पृष्ठभाग (चेसिस) दोन भागात विभागला आहे. एक भाग स्प्रिंगने पुढच्या आसाला (अॅक्सल) जोडला आहे. दुसरा भाग मागच्या आसाला स्प्रिंगने जोडला आहे. हे दोन्ही भाग वाहनाच्या अन्य कोणत्याही भागाला जोडण्यात आले नाहीत. या पृष्ठभागावर वाहनातील चालक व अन्य प्रवाशांच्या खुच्र्या असतात. कारला पुढील भागातून अपघात झाला की पृष्ठभागाच्या स्प्रिंगवर निमिषार्धात ताण येऊन ती मागे सरकेल आणि प्रवाशांचे जीव वाचतील. अशाच पद्धतीने मागून ठोकर बसली तर मागील पृष्ठभाग पुढे येऊन प्रवाशांचे जीव वाचणार. यामध्ये वाहनाचे नुकसान झाले तरी वाहनातील प्रवाशांचे जीव वाचणार आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.