ठाणे : भिवंडी शहरात आणि ग्रामीण भागात वीज वितरण आणि देयक वसूलीचे काम टोरंट पाॅवर कंपनीकडून केले जाता आहे. परंतु टोरंटचे विद्युत मीटर जलद फिरणारे असून देयक अनावश्यकरित्या वाढविले जात आहे. याबाबत नागरिकांमध्ये संताप असून टोरंट पाॅवर या कंपनीला शहरातून हटविण्यात यावे किंवा आणखी एक पर्यायी वीज वितरण कंपनीची व्यवस्था करावी अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

भिवंडी शहरात आणि ग्रामीण भागात महावितरण ऐवजी टोरंट कंपनीकडून वीज वितरण आणि देयक वसूलीचे काम टोरंट पाॅवर कंपनीद्वारे केले जाते. भिवंडीत टोरंट कंपनी हटविण्यासाठी अनेक आंदोलन झाली. टोरंट पाॅवरच्या मुद्द्यावरून निवडणूकाही झाल्या होत्या. आता भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांनी मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. टोरेंट पॉवर कंपनीकडून ग्राहकांवर वीज चोरीचे खोटे गुन्हे दाखल करते. तसेच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक वसुली करत आहे. जलद फिरणारे विद्युत मीटर बसवून देयक अनावश्यकरित्या वाढवले जात आहेत. ग्राहकांच्या मीटर रिडींगची तपासणी न करता त्यांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली जात असल्याचे बाळ्या मामा यांनी पत्रात म्हटले आहे. टोरंट कंपनीकडून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण केले जात नाही. त्यामुळे टोरंट पाॅवर विरोधात नागरिकांमध्ये असंतोष असल्याचेही म्हटले आहे.

भिवंडीतील नागरिक गेल्या १८ वर्षांपासून टोरेंट पॉवर कंपनीच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत असून १ एप्रिल २०२४ पासून कंपनीने विजेच्या दरात सरासरी ६% वाढ लागू केली आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबतच यंत्रमाग उद्योगावरही प्रचंड आर्थिक भार पडला आहे. १०० युनिटपर्यंत ३० पैसे, १०१-३०० युनिटसाठी ६५ पैसे, ३०१-५०० युनिटसाठी ९४ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा जास्त वापरासाठी तब्बल १.०७ रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली आहे. याशिवाय व्यावसायिक व औद्योगिक दरांमध्ये ३ टक्के आणि ५ टक्के वाढ केल्याने भिवंडीच्या पावरलूम उद्योगाला मोठा फटका बसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भिवंडीत टोरंट विरोधात २० हून अधिक मोठी आंदोलने झाली. भिवंडी शहरातील यंत्रमाग उद्योगांना टोरंट पाॅवरच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या देयकाच्या दरात वाढ झाल्याने उद्योग संकटात आले आहेत. शेकडो यंत्रमाग तसेच प्लास्टिक उत्पादन कारखाने बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे हजारो कुटुंबाचे भविष्य संकटात आल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. टोरंट पाॅवर कंपनीला हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी. तथापि पूर्णपणे हटविणे शक्य होत नसल्यास टोरंटसह एखाद्या पर्यायी विद्युत कंपनीला काम करण्याची परवानगी द्यावी. ज्यामुळे नागरिकांना पर्याय उपलब्ध होऊ शकेल असे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader