ठाणे – शहरालाल विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. त्यातील एक वास्तू म्हणजे सेंट जेम्स (सीएनआय) चर्च आहे. या चर्चचे जुने बांधकाम जीर्ण झाले असल्यामुळे या चर्चच्या समितीने चर्चच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. परंतू, या नुतनीकरणा दरम्यान चर्चचा इतिहास पुसला जाणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती सेंट जेम्स चर्च समितीने दिली.

ठाणे शहरात १८२५ साली बांधलेले सेंट जेम्स चर्चला पूर्वी ‘अँग्लिकन चर्च, ठाणे’ तर, ठाणेकर नागरिक पोर्तुगीज चर्च म्हणून ओळखत होते. इंग्रज-प्रोटेस्टंट ख्रिस्ती बांधवांनी या चर्चची उभारणी केली, असे इतिहासात लिहीले आहे. त्यामुळे ठाण्यातील ऐतिहासिक वारसात या चर्चेचा उल्लेख आहे. गेल्या काही वर्षांत, हवामान आणि बाह्य घटकांमुळे या चर्चच्या संरचनेचे नुकसान झाले होते. त्य़ामुळे पुढील पिढीला या चर्चचा इतिहास समजावा यासाठी चर्चेचे नुतणीकरण करण्याचा निर्णय समितीने घेतला. चर्चच्या संरचनेची अखंडता आणि वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण नूतनीकरणाचे प्रयत्न समितीकडून सुरू आहेत.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले हे चर्च काळाच्या कसोटीवर उतरले आहे. परंतु, या चर्चचा इतिहास, समृद्ध वारसा नव्या पिढीला समजण्यासाठी या चर्चचे संवर्धन महत्त्वाचे आहे, असे समितीकडून सांगण्यात आले. सध्याच्या नूतनीकरणाच्या कामात केवळ मूळ दगडी बांधकाम उघड करणेच नाही तर, भविष्यासाठी इमारतीचे संरक्षण करण्यासाठी नवीन प्लास्टर देखील लावण्यात येत आहे. त्यासह, नव्या रचनेत या चर्चचे बांधकाम होणार असले तरी, या चर्चचा ऐतिहासिक वारस्याला कुठेही धक्का लागणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. छप्पर,घंटी, टॉवर, बाह्य दर्शनी भाग आणि आतील भाग यांचा समावेश करून जीर्णोद्धार टप्प्याटप्प्याने केला जात आहे, अशी माहिती चर्च समितीकडून देण्यात आली.

नुतनीकरणानंतर ऐतिहासिक स्थळ म्हणून काम पाहणार

सेंट जेम्स चर्च च्या नुतनीकरणानंतर हे चर्च प्रार्थनास्थळ आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून काम पाहिल, अशी माहिती समितीमार्फत देण्यात आली. तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी हे चर्च ठाण्याच्या वसाहतकालीन वास्तुकलेचे दर्शन घडवेल, असेही त्यांनी सांगितले.

ठाण्यातील सर्वात जुन्या चर्चपैकी सेंट जेम्स हे चर्च आहे. २०० वर्षाचा इतिहास या चर्चला लाभला आहे. त्यामुळे या चर्चचे जतन करण्याचे महत्त्व ओळखून स्थानिक वारसाप्रेमी आणि चर्च समुदायाने या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला. या प्रकल्पाला विविध स्तरातून पाठिंबा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया चर्च समितीतील सदस्य अँथनी शिंदे यांनी दिली.