सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या कल्याणमधील शिवाजी चौकातील सार्वजनिक वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील वाचनप्रेमींसाठी केंद्रिबदू ठरलेल्या या वास्तूची गेल्या काही वर्षांपासून अक्षरश: शकले झाली होती. दुरुस्तीनंतर या इमारतीला पुन्हा नवी झळाळी प्राप्त झाली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर सार्वजनिक वाचनालयाची ही वास्तू आहे. अनेक वर्षांपासून या वास्तूच्या आतील भागाची डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे येथे सर्वत्र वाळवी लागली होती. इमारतीचे तळघर उंदीर, घुशींनी पोखरून काढला होते. त्यामुळे अतिशय दुर्मीळ अशा पुस्तकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. राजीव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारसकर, प्रा. जितेंद्र भामरे यांच्या कार्यकारिणीने उपलब्ध निधीमध्ये वाचनालयाचे जुने रूप बदलण्याचा निर्णय घेतला. जागेचा पुरेपूर वापर आणि सुयोग्य नियोजन करून पुस्तकांची मांडणी कशी करता येईल या दृष्टीने आखणी करून नवीन रचना वाचनालयात करण्यात आली आहे. वाचनालयात ७० हजार विविध प्रकारची पुस्तके आहेत. साडेतीन हजार सदस्य आहेत. रामबागमध्ये अभ्यासिका आहे. तेथे दररोज दोनशे विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. वाचनालयात कोणती पुस्तके उपलब्ध आहेत. किती नवीन पुस्तके  आली आहेत. याची माहिती सार्वजनिक वाचनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते.
रविवारी उद्घाटन
वाचनालयाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता वाचनालयात होणार आहे. यावेळी साहित्यिक रंगनाथ पाठारे, आमदार जगन्नाथ शिंदे, शिल्पकार भाऊ साठे, काका हरदास उपस्थित राहणार आहेत. यावेळी बदलापूर येथील ग्रंथसखाचे श्यामसुंदर जोशी, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे भिकू बारसकर यांनी सांगितले.