|| भगवान मंडलिक

भाडय़ाने घेतलेल्या वाहनांचा मोबदला नाही :- मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण भागातील चार वाहतूकदारांकडून निवडणूक विभागाने निवडणूक कामासाठी बस, कार, जीप अशी सुमारे ७०० वाहने भाडय़ाने घेतली होती. या वाहनांचे मागील सहा महिन्यांपासून निवडणूक विभागाने ५९ लाख १६ हजार ९८९ रुपयांचे देयक अदा केले नसल्याने वाहतूकदारांमध्ये अस्वस्थता आहे.

सहा महिने चकरा मारूनही अधिकाऱ्यांनी दाद न दिल्याने विधानसभा निवडणूक कामासाठी वाहने द्यायची नाहीत, असा निर्णय वाहतूकदारांनी घेतला होता. अधिकाऱ्यांनी विधानसभेसाठी भाडय़ाने घेत असलेल्या वाहनांच्या आगाऊ रकमा वाहतूकदारांना देण्याचे मान्य केल्याने निर्माण झालेली वाहन अडचण आता दूर झाली आहे.

कल्याण, डोंबिवली, ग्रामीण, पूर्व, पश्चिम, अंबरनाथ, बदलापूर परिसरात निवडणूक कामासाठी मुंबई बसमालक संघटनेकडून उपप्रादेशिक अधिकारी निवडणूक काळात बस, जीप, कार तीन ते चार दिवस भाडय़ाने घेतात. सरकारी दराप्रमाणे वाहतूकदार या राष्ट्रीय कामासाठी वाहने भाडय़ाने देतात. मे महिन्यात झालेल्या लोकसभेसाठी या संघटनेने वाहने निवडणूक कामासाठी दिली होती. खासगी वाहतूकदार संघटनेच्या नावाखाली निवडणूक विभागाला वाहने उपलब्ध करून देतात. निवडणुकीनंतर उपलब्ध निधी वाटप श्रेणीत वाहतूकदारांचे देयक प्रथम अदा करावे असे संकेत असताना मागील सहा महिन्यांपासून कल्याण परिसरातील चार वाहतूकदारांचे एकूण ५९ लाखांचे देयक अदा केले नाही.

अशी आहे थकबाकी

  •  खंडेराय ट्रॅव्हल्स :२८ लाख १२ हजार
  • सनी ट्रॅव्हल्स :२५ लाख ४६ हजार
  • मंदार ट्रॅव्हल्स : चार लाख ९८ हजार
  • जय तुळजाभवानी ट्रॅव्हल्स : ६० हजार

प्रश्न सुटला..

मुंबई बसमालक संघटनेच्या माध्यमातून कल्याण विभागात वाहने निवडणूक कामासाठी दिली जातात. अगोदरच्या खर्चाची आणि चालू खर्चाची देयक देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. निवडणूक कामासाठी वाहने देण्याचे संघटनेने मान्य करून ‘आरटीओ’ला वाहन संख्येची माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणतीही अडचण राहिली नाही.

निवडणूक वाहन खर्च निधीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यामुळे वाहने मिळणार नाहीत ही अडचण दूर झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात अधिक वाहने आणि अधिक खर्च होतो. वाढीव निधीची मागणी केली आहे. त्यामुळे वाहतूकदार, देयक हा विषय संपुष्टात आला आहे. – राजेश नार्वेकर,  जिल्हाधिकारी