ठाणे : गेल्यावर्षी पावसाळ्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या घोडबंदर येथील गायमुख घाट रस्ता पहिल्याच पावसात उखडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल झाले असतानाच, त्यापाठोपाठ वन खात्याकडून काँक्रीटीकरणाला परवानगी मिळाली नसल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची पुन्हा डांबरीकरणाद्वारे डागडुजी करण्यात येणार आहे. तसे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी सायंकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, घोडबंदर रोड येथील ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड फोरम’चे प्रतिनिधी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, सहायक संचालक, नगररचना संग्राम कानडे, घोडबंदर रस्ता येथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम, यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, मिरा- भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महा मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. परंतु, त्यावरील गायमुख घाट रस्ता काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या कामास वन खात्याकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठकीत दिली. त्यावर आयुक्त राव यांनी काही महत्वाच्या सुचना केल्या. वन खात्याकडून आवश्यक परवानगी मिळालेली नसल्यामुळे गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश राव यांनी दिले. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी पावसाळ्यापुर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. यामुळे नागरिकांचा प्रवास पावसाळ्याक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात पहिल्यात पावसात डांबरी रस्ता उखडला आणि दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागला होता. असे असतानाच, यंदा पुन्हा रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डांबरीकरण केलेला रस्त्यावरून सुखकर प्रवास होईल का आणि पावसाळ्याच डांबर उखडणार तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी गायमुख घाट दुरुस्तीबद्दल सद्यस्थिती बैठकीत जाणून घेतली. पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार नसल्याने, हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ऐन पावसाळ्यात वाहतूक योग्य राहील, याची काळजी घ्यावी अशी सूचना केली. तसेच मेट्रो, सेवा रस्त्याचे एकत्रीकरण आणि भाईंदरपाडा व कासारवडवली उड्डाणपूल यांचे बांधकाम ही कामे सुरू असल्याने त्यात गायमुख रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची भर घालू नये, अशी सूचना प्रतिनिधींनी केली. त्याला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, तसेच वन विभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगीची सद्यस्थिती जाणून घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाबाबत वन विभागाने अधिकची माहिती मागवली आहे. या सगळ्या प्रक्रियेस लागणारा संभाव्य वेळ लक्षात घेऊन तुर्तास, येत्या पावसाळ्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असून त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.