ठाणे : ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या कळवा येथील जुन्या पुलावर येत्या महिन्याभरात मास्टिक तंत्रज्ञान पद्धतीने डांबरीकरण केले जाणार आहे. हा संपूर्ण पूल सध्या पेव्हर ब्लाॅकचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडून वाहतुकीचा वेग मंदावतो. पुलाचे डांबरीकरण झाल्यास नवी मुंबई, कळवा, विटावा येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा पूल एकेरी पद्धतीने खुला होणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी कळवा, विटावा येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतुकीसाठी कळवा जुना पूल अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पंरतु प्रशासनाने या पुलावर डांबरीकरणाऐवजी पेव्हर ब्लाॅकचे बांधकाम केले होते. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी या पुलावरील पेव्हर ब्लाॅक बाहेर निघून खड्डे पडत होते. या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम कळवा, विटावा, दिघा, खारेगाव, सिडको, कोर्टनाका, साकेत, राबोडी या भागांवर होत होता. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वर्षांपासून ठाणे महापालिका तिसऱ्या खाडी पुलाची निर्मिती करत होती. नुकतेच या नव्या पुलाचे काम पूर्ण झाले असून पूल साकेत, कोर्टनाका आणि सिडको येथून नवी मुंबई, कळवा, विटावाच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी सुरू झालेला आहे. असे असले तरी जुन्या पुलावरूनही काही वाहनांची वाहतूक सुरूच होती.
नव्या कळवा पुलामुळे कोर्टनाका, सिडको भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने जुन्या कळवा पुलाचे पेव्हर ब्लाॅक काढून मास्टिक पद्धतीने डांबरीकरणाचा निर्णय घेतला होता. त्या कामास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. सुमारे दीड महिन्यात पुलाच्या दोन्ही दिशेकडील पेव्हर ब्लाॅक टप्प्याटप्प्याने काढले जाणार असून तिथे डांबरीकरण केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी ही मार्गिका एकेरी पद्धतीने सुरू होणार आहे. त्यामुळे कळवा, विटावा भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्ती होईल.
कळवा येथे ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. तसेच नवी मुंबई भागात आंतरराष्ट्रीय कंपनी सुरू झाल्याने ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हजारो नागरिक त्यांच्या वाहनाने ठाणे-बेलापूर मार्गे नवी मुंबईत जात असतात. त्यामुळे वाहनांचा भार सध्या कळवा, विटावा भागात वाढला आहे. हा जूना पूल एकेरी सुरू झाल्यास कोंडीची समस्या मिटू शकते. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकण्याचे प्रमाणही घटणार असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांनाही दिलासा मिळेल.