अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट एक आणि दोनवरून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा असलेल्या कर्जत दिशेच्या पादचारी पुलाची रेल्वे प्रशासनाने दुरूस्ती सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे येेथे अपघात होण्याची भीती व्यक्त होते आहे. स्थानकात दोनच पूल असून त्यातील एक पूल मुंबईच्या दिशेला आहे. मात्र हा पूल स्थानकाबाहेर दूरवर उतरत असल्याने प्रवाशांकडून या पुलावरून जाण्याऐवजी रूळ ओलांडलण्याला पसंती दिली जाते आहे.
हेही वाचा- कल्याण: सिंहगड एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी प्रवासी घालतायत जीव धोक्यात; रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष
अंबरनाथ रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी गेल्या काही वर्षात विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. बदलापूर स्थानकातील होम फलाट तीन वर्षांनंतरही अपूर्ण असताना अंबरनाथ स्थानकातील होम फलाट वापरात आला आहे. मुंबईच्या दिशेने एका पादचारी पुलाचे येथे उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडण्यासाठी नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सध्या बदलापूर दिशेला असलेल्या फलाट क्रमांक एक आणि दोनवर असलेल्या जुन्या पादचारी पुलाच्या दुरूस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. या पुलाचा फलाट क्रमांक एक आणि दोनवरील सर्वाधिक प्रवासी वापर करतात. फलाट क्रमांक एकला असलेल्या होम फलाटावरून स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे.
अंबरनाथच्या पूर्व भागात अधिक प्रवासी जातात. त्यामुळे त्यांच्याकडून फलाट क्रमांक एक दोनवर असलेल्या पादचारी पुलाचाच वापर केला जातो. मात्र आता हा पुल दुरूस्तीसाठी बंद असल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. याच फलाटावर मुंबईच्या दिशेने नवा पुल आहे. मात्र या पुलावरून स्थानकात उतरल्यानंतर चिंचोळा रस्ता असून तो मुख्य बाजारपेठेपासून दूर सोडतो. त्यामुळे प्रवासी या पुलाकडे पाठ फिरवतात. सध्या कर्जत दिशेचा पुल बंद असल्याने प्रवाशांनी जीव धोक्यात घालून थेट रेल्वे रूळांवरून प्रवास सुरू केला आहे. एखादी लोकल गाडी स्थानकात आल्यास प्रवाशांची मोठी गर्दी रूळावरून प्रवास करण्यासाठी फलाटाच्या शेवटच्या टोकाजवळ जमते. यात जर एखादी जलग एक्सप्रेस किंवा लोकलगाडी गेल्यास अपघात होण्याची भिती आहे. त्यामुळे ही सोपी वाटणारी ही धोकादायक वाट बंद करण्याची गरज व्यक्त होते आहे.