ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम रविवारी सायंकाळी पूर्ण झाले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पुलाच्या मार्गिकेवरील लोखंडी सांध्याचा भाग निखळला होता. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने निखळलेल्या भागाची दुरुस्ती सुरू केली होती. या दुरुस्तीमुळे ठाणे आणि भिवंडी शहरात वाहतूक कोंडीचा फटका चालकांना सहन करावा लागत होता.
मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीसाठी साकेत पूल महत्त्वाचा आहे. या पुलावर उरण येथील जेएनपीटी बंदर, गुजरात, नाशिकच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. तसेच हलक्या वाहनांची वाहतूकही मोठ्याप्रमाणात होते. मंगळवारी रात्री या पुलावरील मार्गिकेचा सांधा निखळला होता. या पुलाच्या दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने हाती घेतले होते. वाहतूक पोलिसांकडून येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सोडण्यात येत होती. त्यामुळे भिवंडी आणि ठाणे शहरात वाहतूक कोंडी होत होती.
हेही वाचा – ठाणे पालिकेतील ४५ सफाई कामगारांना थकीत वेतन मिळणार
काही दिवसांपूर्वीच राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे वाहतूक पोलिसांना एक पत्र पाठविले होते. त्यात या पुलावरून अवजड वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूकही पूर्व द्रुतगती महामार्गाने वळविली होती. अखरे रविवारी सायंकाळी या पूलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी आता एकेरी ऐवजी पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साकेत पूलाचे काम पूर्ण झाल्याने ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.