बदलापूरः मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर माफी मागावी लागली. त्यानंतर भरभक्कम पुतळा उभारण्याकडे राज्य शासनाने भर दिला आहे. मात्र मालवणप्रमाणेच बदलापुरातही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप करत सुमारे ३०० पुतळे उभारणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच निविदा प्रणालीचा भंग करत न्युनतम दर तसेच अनुभव डावलून काम दिल्याचाही आरोप आल्हाट यांनी केला आहे. पालिकेने मात्र संकल्पना आणि सादरीकरणावरून काम दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बदलापुरचा शिवरायांचा पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने उल्हास नदीलगत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. या निवीदा प्रक्रियेत कराहा स्टुडिओ, बालाजी, संकेत कैलास साळुंखे, राज एन्टरप्रायजेस या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तर निविदा भरलेल्या कंपन्यांना २९ ऑगस्ट रोजी पालिका प्रशासनाने सादरीकरणासाठी पाचारण केले होते. सादरीकरण आणि निविदाकारांच्या चर्चेवेळी असे दिसून आले की कराहा स्टुडिओनी एकही पुतळा बसविलेला नव्हता. तर दुसरा निवीदाकार बालाजी यांनी दोन ते तीन पुतळे बसविलेले होते. तसेच तिसरा निवीदाकार असलेल्या संकेत कैलास साळुंखे यांनी तर पुतळ्याची कामेच केली नव्हते, अशी माहिती शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी दिली आहे. त्याचवेळी माझ्याकडे कलाक्षेत्रातील २८ वर्षांचा अनुभव असुन मी ३०० ते ४०० पुतळे ब्राँझ धातुमध्ये बसविलेले आहेत असेही आल्हाट यांनी सांगितले. सादर केलेल्या निविदांमध्ये कराहा स्टुडिओ यांनी ९५ लाख २८ हजार ६००, बालाजी कंपनीने ९९ लाख ०८ हजार ६०० तर संकेत कैलास साळुंखे यांनी ९७ लाख १३ हजार २०० अशी बोली लावली होती. तर आम्ही राज एन्टरप्रायजेसच्या वतीने ६३ लाख १३ हजार असे दर नमुद केल्याचे आल्हाट यांनी सांगितले आहे. न्युनतम निविदा असतानाही कराहा स्टुडिओला काम दिल्याचे पालिका प्रशासनाने सांगितल्याचे आल्हाट यांनी सांगितले. आर्थिक संबंधामुळे सुधारित निवीदा प्रणालीचा भंग केल्यामुळे पुन्हा मालवण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची संभावना दिसत आहे. त्यामुळे आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती आल्हाट यांनी दिली आहे.

हेही वाचा – ठाणे : पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी अवजड वाहतुकीला बंदी

पालिका म्हणते सादरीकरणावरून निर्णय

निविदा प्रक्रियेत प्राप्त होणाऱ्या संकल्पनेतून सर्वोत्तम संकल्पना स्वीकृत करायची असल्याने सादरीकरणाअंती कराहा स्टुडिओचे ललीत धनवे यांची संकल्पना प्राप्त संकल्पनांमधून उत्कृष्ठ आणि रुबाबदार आढळून आल्याने ती स्वीकृत करण्यास पुतळा समितीने मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार विहित प्रक्रिया अवलंबून ललीत प्रदीप धनवे, कराहा स्टुडीओ यांना कामाचे कार्यादेश प्रदान केलेले आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे. ज्या निकषांवर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती ते निकष उपोषणकर्त्यांनी पूर्ण करायला हवे होते असेही गायकवाड म्हणाले.

हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठयांचा खेळ !

पालिकेचा विरोध

या निर्णयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स माध्यमावरून मत मांडले आहे. सर्वात कमी देकार, २८ वर्षांचा अनुभव आणि ३०० पुतळे उभारणाऱ्या शिल्पकाराला डावलून जादा दराने निविदा भरणाऱ्या आणि सुमारे २८ वर्षे वय तसेच एकही पुतळा उभारणीचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला काम दिले. बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती होत तर नाही ना असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर मंगळवारी मराठा समाजाच्या वतीने पालिकेचे शहर अभियांत्याना घेराव घालून जाब विचारण्यात आला. तसेच शहर अभियंत्यांच्या दाराला नोटांचा हार लावून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शैलेश वडनेरे यांनीही उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.