ठाणे येथील वर्तकनगर भागात उभारण्यात येत असलेल्या ठाणे महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी पर्यावरणाचा बळी दिला जात असल्याचे समोर आले आहे. इमारतीसाठी ६३१ वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याचा निर्णय घेण्यात आला घेतला आहे. उद्यान आणि वनराई असल्याने या भागात कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी करणाऱ्यांनी याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेचे पाचपाखाडी परिसरात चार मजली मुख्यालय आहे. वाढत्या नागरिकरणामुळे ही इमारत अपुरी पडत असल्याने ५७२ कोटी रुपये खर्चुन नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पुर्ण करण्याचे नियोजन असून विधानसभा निवडणुकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. मात्र इमारतीसाठी २९५६ वृक्षांवर गदा येणार असून त्यातील २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा आणि ६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सुचना मागविण्यात आल्या आहेत.

इमारतीसाठी बगीचाचे आरक्षण बदलाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी तयार केला होता. याविरोधात ‘रेमंड टेक्स एक्स हॅबिटट’ इमारतीमधील रहिवाशांनी आंदोलन केले होते. असे असतानाही आरक्षण बदलण्यात आले. याशिवाय, याठिकाणी सुरू असलेले जलकुंभाचे कामही थांबविण्याचे आदेश देण्यात आले. तशातच आता सुमारे ३ हजार वृक्षांवर गंडांतर येणार असल्याने रहिवाशांचा याला तीव्र विरोध असून सार्वजनिक सुनावणी घेण्याची त्यांची मागणी आहे.

याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. प्रस्तावावर नागरिकांकडून हरकती आणि सुचना मागविण्यात आल्या असून त्यावर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल.-मधुकर बोडके, महापालिका उपायुक्त

मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होईल. अनेकदा पुनर्रोपित झाडे जगण्याची शक्यता कमी असते. नवी प्रशासकीय इमारत आवश्यक आहे. परंतु, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी इतर पर्यायी जागांचा विचार केला जावा. सुभाष जगतापस्थानिक रहिवासी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Replantation of 2097 trees for thane municipal headquarters amy