डोंबिवली: येत्या नवीन वर्षात २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होऊन भाविकांसाठ ते खुले केले जाणार आहे. अनेक वर्षांचे देशासह विदेशातील रामभक्तांचे हे स्वप्न पूर्ण होणार असल्याने या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर स्थानिक नागरिकांना राम मंदिराची प्रतिकृती कशी आहे हे पाहता यावे म्हणून डोंबिवली जीमखाना येथे एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी, ता. २३ डिसेंबर रोजी डोंबिवली जीमखान्यातील या प्रतिकृतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी डोंबिवली, कल्याण परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ६० फूट बाय ४० फूट उंच आकाराची ही राम मंदिराची प्रतिकृती दूरवरून नागरिकांना दर्शन देत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बारकावे स्थानिकांना या प्रतिकृतीच्या माध्यमातून पाहाता येणार आहेत. उद्घाटनानंतर राम मंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील दोन महिने खुली राहणार आहे.

हेही वाचा… ठाण्यातील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलला; पांढरा-काळ्या रंगाऐवजी आता पांढरा-लाल रंग; प्रायोगिक तत्वावर तीन हात नाका येथे प्रयोग

ज्येष्ठ आणि प्रसिध्द कलादिग्दर्शक उदय अरविंद इंदप आणि त्यांची कलादिग्दर्शक कन्या सानिका इंदप यांनी या कलाकृतीची मागील काही महिने मेहनत घेऊन उभारणी केली आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे कलानिपुण प्रभू कापसे यांनी या उभारणीत समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे. या प्रतिकृतीच्या कळसाची उंची ४० फूट आहे.

मंदिर प्रतिकृती उभारणीत फॅब्रिकेशन, प्लायवुड, प्लास्ट्र ऑफ पॅरिस साधनांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाईचे काम महेश वामन गावडे यांनी केले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर जय जय श्रीराम गाण्याची धून भक्तांच्या कानी गुंजणार आहे. हे गाणे संगीतकार श्रेयस आंगणे, गीतकार श्रीकांत बोजेवार, ज्येष्ठ गायक प्रभंजन मराठे, सुहास सामंत, गौरी कवी आणि सहकलाकारांच्या गायनातून साकारले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या प्रतिकृतीच्या पाहणीसाठी येण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

येत्या नवीन वर्षात जानेवारीमध्ये अयोध्येत राम भक्तांचे राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होत आहे. या मंदिर उद्घाटनाचा जागर राम भक्तांकडून देशभर केला जात आहे. प्रत्येक नागरिकाला अयोध्येत जाणे शक्य होणार नाही. म्हणून स्थानिक नागरिकांना आपल्या घर परिसरात राम मंदिर कसे आहे हे पाहता यावे या उद्देशातून डोंबिवली जीमखाना येथे राम मंदिराची प्रतिकृती उभारणीचे काम डोंबिवली एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शनिवारपासून ही प्रतिकृती भाविकांसाठी खुली होणार आहे. -रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Replica of ram temple at dombivli gymkhana inauguration by public works minister ravindra chavan dvr