ठाणे : अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या ठाणे आणि घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक रात्री नऊनंतरच सुरू करावी, अशी मागणी ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी सोमवारी ठाणे महापालिका प्रशासनासह इतर शासकीय यंत्रणासोबत झालेल्या बैठकीत केली. या संदर्भात वाहतूक विभागाने अधिक चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सुचना आयुक्त राव यांनी केली.
ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई- नाशिक तसेच घोडबंदर मार्ग जातो. या मार्गावरून उरण येथील जेएनपीटी बंदर, गुजरात, मुंबई आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत अवजड वाहतूकीला शहरात परवानगी देण्यात आली आहे. परंतु या वेळे व्यतिरिक्त शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहतुकीमुळे ठाणे आणि घोडबंदर परिसरात कोंडीची समस्या निर्माण होते. पावसाळ्यात ही समस्या अधिक बिकट होते. त्यात एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर, अभुतपुर्व कोंडी होते. या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक रात्री नऊनंतरच सुरू करावी, अशी मागणी ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी केली.
घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी सायंकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत प्रलंबित कामे, सीसीटीव्ही नेटवर्क, सिग्नल परिसरातील रस्त्यांची डागडुजी, खोदकाम करताना विविध यंत्रणांमधील समन्वय आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली. या बैठकीत ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहतूकीमुळे होणाऱ्या कोंडीची मुद्दा उपस्थित केला. पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक रात्री नऊनंतरच सुरू करावी. मुंबई आणि नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांविषयी समन्वय साधून त्यांचे नियंत्रण करण्यात यावे, अशी सूचना ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी केली. त्यासंदर्भात वाहतूक विभागाने अधिक चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आयुक्त राव म्हणाले. कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान मेट्रोने ३० आणि ३१ मार्च रोजी तेथील सर्व कामे पूर्ण करून घ्यावीत. तर, पाच आणि सहा एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी. त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
आनंदनगर येथील आरएमसी प्लांटकडे कोणत्याही परवानगी नसल्याने काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या आठवडी बाजाराला परवानगी देताना बाजार संपल्यानंतर श्रमदानाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करून तो परिसर स्वच्छ ठेवण्याची अट परवानगी देतानाच घातली जाईल, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. आनंदनगर मैदानात या आठवडी बाजाराला परवानगी देता येईल का याची व्यवहार्यता तपासून घेण्याचे निर्देशही राव यांनी बैठकीत दिले.
वॉर्डनची संख्या वाढणार
वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या वॉर्डनच्या संख्येबद्दल या बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पगाराविषयीचे प्रश्न सोडवून जास्तीत जास्त वॉर्डन रस्त्यावरती वाहतूक नियंत्रणासाठी उपयोगी येतील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रो तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्याचबरोबर, घोडबंदर रोड परिसरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायटी, मॉल, शाळा, व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांच्याकडील एक वॉर्डन हा त्यांच्या हद्दीच्या बाहेर वाहतुकीच्या सोयीसाठी तैनात करावा, असे पत्र महापालिका शहर विकास विभागामार्फत या सर्व आस्थापनांना देणार असल्याचेही आयुक्त राव यांनी सांगितले.