ठाणे : ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. या रेल्वेचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. वातानुकूलित रेल्वेची वाहतूक सुरू होऊन दोन महिने उलटत असतानाही दर कमी झाले नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे वातानुकूलित उपनगरीय रेल्वेच्या तिकिटाच्या दरामध्ये कपात करण्यात यावी, या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली.
१८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे ते दिवा या स्थानकांदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले होते. या मार्गिका तयार झाल्याने उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होईल, असा दावा केला जात होता. रेल्वे प्रशासनाने सामान्य उपनगरीय रेल्वेगाडय़ांऐवजी वातानुकूलित रेल्वेची संख्या वाढविली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकिटाचा दर हा तुलनेने अधिक आहे. त्यामुळे वातानुकूलित रेल्वे अद्यापही उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस आलेली नाही. वातानुकूलित रेल्वे सुरू केल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही लवकरच या रेल्वेच्या तिकिटाचे दर हे कमी केले जातील, असा दावा केला होता.
या रेल्वे सुरू होऊन दोन महिने होत आले असतानाही प्रशासनाने रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये कपात केली नाही. त्यामुळे वातानुकूलित रेल्वेनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. तसेच या रेल्वेमध्ये प्रवासी संख्याही तुरळक आहे. या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस लता अरगडे, राजश्री पांजणकर यांच्यासह डोंबिवली आणि अंबरनाथ येथील काही प्रवासी महिलांनी मध्य रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक टी. सुषमा यांची भेट घेतली.
वातानुकूलित रेल्वेच्या तिकिटाच्या दरामध्ये कपात तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र प्रवासी संघटनेने टी. सुषमा यांना दिले आहे.
वातानुकूलित रेल्वेगाडय़ांचे तिकिटाचे दर अधिक आहेत. त्यामुळे तिकीट दरांत कपात करावी या मागणीसाठी आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे.-लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा