ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या सोडती प्रक्रीया आज, शुक्रवारी होणार आहे. यामध्ये ठाणे महापालिकेत १०.४ टक्के तर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत २७ टक्के इतके नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण जाहीर होणार असून या प्रक्रीयेमुळे इच्छूकांची धाकधूक वाढली आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिकांची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली असून या सर्वच ठिकाणी प्रशासकीय राजवट लागू झालेली आहे. आधी करोना संकट आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका अद्याप जाहीर होऊ शकलेल्या नाहीत. त्यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणुक आयोगाने घेत त्याप्रमाणे निवडणुक पुर्व प्रक्रीया उरकण्यास सुरुवात केली. त्यानुसार या महापालिकांनी प्रभाग रचना अंतिम करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. असे असतानाच ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा बांठीया अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्विकारल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील महापालिकांना बांठीया आयोगाप्रमाणे ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी आज, शुक्रवारी आरक्षण सोडत कार्यक्रम ठेवला आहे. ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच शनिवार ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर शनिवार ३० जुलै ते मंगळवार २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. तर, कल्याण-डोंबिवली पालिकेची आरक्षण सोडत प्रक्रीया सकाळी ११ वाजता कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृह येथे पार पडणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यापुर्वी सर्वसाधारण महिला आणि पुरुषांसाठी जागा आरक्षित झाल्या असून त्यामध्येच आता ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छूकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले असून या प्रक्रीयामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.

पालिकानिहाय आरक्षण
ठाणे महापालिकेत एकूण नगरसेवक संख्या १४२ इतकी आहे. बांठीया आयोगानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात १०.४ टक्के इतके आरक्षण लागू होणार आहे. यामुळे ओबीसी समाजाला १५ जागा मिळणार असून त्यापैकी ८ जागा राखीव असणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत १३३ इतकी आहे. याठिकाणी २७ टक्के इतके ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार आहे. यामुळे ओबीसी समाजाला ३५ जागा मिळणार असून त्यापैकी १८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर, उल्हानगर पालिकेत एकूण नगरसेवक संख्या ८९ इतकी आहे. याठिकाणी २७ टक्के इतके आरक्षण लागू होणार असून त्यानुसार ओबासी समाजाला २४ जागा मिळणार आहेत. त्यापैकी १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

भिवंडीचे आरक्षण ५ ऑगस्टला
भिवंडी महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १०१ इतकी आहे. त्यात ओबीसी समाजाला २७ टक्के याप्रमाणे २७ जागा मिळणार आहेत. त्यात १४ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. याशिवाय, अनुसूचित जातीसाठी तीन जागा तर, अनुसूचित जमाती २ जागा राखीव आहेत. या सर्व जागांसाठी येत्या ५ ऑगस्टला आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Story img Loader