ठाणे : ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि पाच पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली आहे. यात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले. तर बिगर अनुसूचित क्षेत्रातील चार तालुक्यांसाठीही आरक्षण निश्चित झाले आहे.
ठाणे जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. ग्राम विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण हे आरक्षण निश्चित करून देण्यात आले होते. सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या आरक्षणासाठी चिठ्ठीद्वारे शालेय विद्यार्थी आकाश सिंग याने चिठ्ठी काढून सोडत काढली. त्यात ही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाली. तसेच जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या एक पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित करून देण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्णतः अनूसूचित क्षेत्र असल्यामुळे शहापूर पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बिगर अनुसूचित क्षेत्रातील चार तालुक्यांसाठी आरक्षण निश्चित करून देण्यात आले आहे. त्यानुसार, अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी एक पंचायत समिती सभापतीपद राखीव ठेवण्यात आले. त्यामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार हे आरक्षण यावेळी भिवंडी तालुका पंचायत समितीसाठी राखीव झाले आहे. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार २०१७ साली मुरबाड आणि २०१९ रोजी अंबरनाथ पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेले होते. यावेळी उतरत्या क्रमानुसार हे आरक्षण भिवंडी पंचायत समिती सभापती पदासाठी लागू झाले आहे.
पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे
शहापूर – अनुसूचित जमाती
भिवंडी – अनुसूचित जमाती
कल्याण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
मुरबाड – सर्वसाधारण महिला
अंबरनाथ – सर्वसाधारण