मनसे, काँग्रेससह अन्य पक्षांच्या उमेदवारांचा समावेश
ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या निवडणुकीत २१३ पैकी १६० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यामध्ये काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसपा, बहुजन मुक्ती, संभाजी ब्रिगेड या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्या इतकीही मते मिळविता आलेली नाहीत.
ठाणे जिल्ह्य़ात १८ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी ३७२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत २५१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, मात्र त्यापैकी ३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे २१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले होते. त्यामध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा, वंचित आघाडी, इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.
जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २१३ उमेदवार निवडणूक लढवीत असले तरी प्रत्यक्षात मात्र, ३० ते ४० उमेदवारांमध्येच चुरशीची लढत रंगली होती. त्यामुळे उर्वरित उमेदवारांची अनामत रक्कम
जप्त होणार असल्याची चर्चा जिल्ह्य़ात सुरू होती. असे असतानाच निवडणुकीच्या निकालानंतर २१३ पैकी १६० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने राजकीय वर्तुळात आता वेगवेगळी चर्चा रंगली आहे.