कल्याण – टिटवाळा पूर्व प्रसिध्द गणेश मंदिरा जवळील पालिकेच्या बगिचा, तलाव विकासासाठी आरक्षित असलेल्या आठ हजार ५०० चौरस मीटरच्या भूखंडावर विकासकांनी बांधकामासाठी पाया आणि लोखंडी खांब उभारून पक्क्या बांधकामाची तयारी केली होती. यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी संबंधित विकासकाला नोटीस पाठवून तातडीने ते बेकायदा बांधकाम काढून घ्या, अन्यथा पालिका कारवाई करून सर्व पाडकाम खर्च वसूल करेल, अशी तंबी देताच विकासकाने स्वताहून आरक्षित भूखंडावरील बांधकाम काढून टाकल्याची घटना घडली आहे.

टिटवाळा, मांडा परिसरात मागील दोन महिन्यांपासून अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांविरुध्दच्या आक्रमक मोहिमेमुळे भूमाफिया अस्वस्थ आहेत. आतापर्यंत दोन हजाराहून अधिक बेकायदा बांधकामे अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट केली आहेत. टिटवाळ्यातील प्रसिध्द गणेश मंदिराजवळील पालिकेच्या बगिचा, उद्यान आरक्षित भूखंडांवर हंसराज पटेल आणि भूमिका पटेल यांनी बेकायदा बांधकाम सुरू केले असल्याची तक्रार रहिवासी बेहराम इराणी यांनी साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याकडे केली होती.

पालिकेच्या एकही आरक्षित भूखंडावर नव्याने बेकायदा बांधकाम होता कामा नयेत, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश आहेत. या आदेशाप्रमाणे साहाय्यक आयुक्त पाटील यांनी पटेल यांनी बेकायदा बांधकाम केलेल्या राखींव भूखंडाची पाहणी केली. तेथे सिमेंट काँक्रीटचा पाया आणि लोखंडी खांब उभारून पक्के बांधकाम केले जात असल्याचे आढळले. पाटील यांनी तात्काळ बांधकामधारक पटेल बंधूंना नोटिसा काढल्या. आरक्षित भूखंडावरील बेकायदा बांधकाम तातडीने हटविण्याची नोटीस दिली. बांधकाम हटवले नाहीतर पालिका कारवाई करील आणि पाडकाम खर्च प्रशासन आपल्याकडून वसूल करील, अशी तंबी दिली.

पालिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे पटेल बंधूंनी तातडीने आरक्षित भूखंडावरील पक्के बांधकाम स्वताहून काढून घेतले. या आरक्षित भूखंडावरील बांधकामाला स्थानिकांनी विरोध केला होता, पण त्याची दखल बांधकामधारक घेत नव्हते, अशा स्थानिकांच्या तक्रारी होत्या.

एकाही आरक्षित भूखंडावर यापुढे नवीन बेकायदा बांधकाम होता कामा नये असे आयुक्तांचे आदेश आहेत. या आदेशाप्रमाणे टिटवाळा गणेश मंदिराजवळील राखीव भूखंडावर बेकायदा बांंधकाम करणाऱ्या बांधकामधारकांना नोटीस पाठवली. संबंधित भूखंड आक्रमक भूमिका घेऊन मोकळा करून घेतला. या भूखंडावर नव्याने बेकायदा बांधकाम होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.