डोंबिवली : मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील टपाल विभागातर्फे भरविण्यात आलेले टपाल तिकिटांचे एक प्रदर्शन पाहण्यासाठी डोंंबिवलीतील एक ज्येष्ठ नागरिक रमेश पारखे (८२) दरवर्षीप्रमाणे गेले होते. या प्रदर्शनातील काही साहित्य रमेश पारखे यांना खरेदी करायचे होते. म्हणून त्यांनी प्रदर्शनातील खिडकी क्रमांक ३२ वर जाऊन मराठी भाषेतून विचारणा केली. त्यावेळी तेथील सेवकाने ‘तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला’, असे सांगितले. आपणास मराठी येत नाही का, असा प्रश्न पारखे यांनी केला. त्यावेळी संतप्त झालेल्या सेवकाने पारखे यांच्याशी अरेरावीची भाषा करून ‘तुम्ही माझी कोणाकडेही तक्रार करा. माझे कोणी काही करणार नाही,’ अशी उद्दाम भाषा वापरली.
तुम्ही काहीही करा, मी मराठीत बोलणार नाही, असा इशारा संबंधित सेवकाने रमेश पारखे यांना दिला. हा सगळा प्रकार पाहून रमेश पारखे काही क्षण हडबडले. २२ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत टपाल विभागातर्फे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या महापेक्स प्रदर्शनाला पारखे दरवर्षी भेट देतात. आवडती तिकिटे ते खरेदी करतात.
प्रदर्शनातील काही साहित्य खरेदी करायचे असल्याने पारखे यांनी तेथे विचारणा केली. तेव्हा त्यांना खिडकी क्रमांक ३२ वर जाऊन चौकशी करा, असे सांगण्यात आले. पारखे त्या खिडकीवर येऊन साहित्य खरेदीविषयी मराठीतून बोलू लागले. तेथील सेवकाने तुम्ही हिंदीतून बोला. तुम्हाला मराठी समजत नाही का, असा प्रतिप्रश्न पारखे यांनी सेवकाला केला. तेव्हा सेवकाने एकदा सांगितलेले तुम्हाला समजत नाही का, असा प्रश्न केला.
महाराष्ट्रात राहून या सेवकांना मराठी येत नाही. उलट हिंदीतून बोलण्यासाठी इतकी उद्दाम भाषा. या प्रकाराने व्यथित झालेल्या पारखे यांनी प्रदर्शनात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. सर्व आयोजक उद्गाटन, प्रदर्शनाच्या गडबडीत असल्याने त्यांच्या तक्रारीची तेथे कोणी दखल घेतली नाही.
व्यथित मनाने घरी येऊन प्रदर्शनात घडल्या प्रकाराची रमेश विठ्ठल पारखे यांनी जनरल पोस्ट विभागाचे संचालक यांना एक तक्रार करून प्रदर्शनातील संबंधित सेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कल्याण, डोंबिवलीत गेल्या वर्षापासून मराठी, परप्रांतीयांमधील कुरबुऱ्या सुरूच आहेत. अशाच एका प्रकरणात कल्याणमध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याने एक परप्रांतीयावर गुन्हा दाखल होऊन ते तुरुंगात आहेत.
मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शासनाने मराठी भाषेचा आग्रह धरला आहे. अशा परिस्थितीत टपाल विभागातील एक सेवक आपणास मराठी येत नाही, आपण हिंदीतून बोला, असे उद्दाम उत्तर देऊन मराठी माणसाची अवहेलना करत असेल तर याप्रकरणाची शासनानेही गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. – रमेश पारखे, ज्येष्ठ नागरिक, डोंबिवली.