दशकभरापूर्वीची इमारत पडल्याने बांधकामांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह
विरारच्या कोपरी येथील नित्यानंद धाम इमारतीच्या दुर्घटनेनंतर या परिसरातील इतर इमारतींच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अवघ्या १२ वर्षांची इमारत कोसळल्याने त्याच्या गुणवत्ता आणि बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विरार पूर्वेच्या कोपरी येथील नित्यानंद धाम या चार माजली इमारतीचा चौथ्या मजल्याचा काही भाग अचानक रात्री तिसऱ्या मजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत भूमी पाटील या ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. महापालिकेने ही इमारत खाली करून या इमारतीत राहणाऱ्या ४५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. ही इमारत ही २००८ रोजी स्थानिक विकासक मुकुंद पाटील यांनी बांधली होती. केवळ १० वर्षांत ही इमारत जर्जर झाल्याने इमारतीच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे काम चालू केले आहे. तसेच या परिसरातील इतर इमारतींना बांधकाम परीक्षणं करून घेण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.
नित्यानंद धाम ही अवघ्या १० वर्षांची इमारत पडल्याने या परिसरातील इतर इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात आणखी ३० ते ४० इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. यात शेकडो कुटुंबे राहत आहेत. पण आजतागायत महापालिकेने एकही इमारतीला कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली नाही. आदल्या दिवशीच भूमीचा वाढदिवस होता. तो इमारतीच्या सर्व रहिवाशांनी साजरा केला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी नियतीने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. भूमीचे वडील विनोद पाटील हे या इमारतीच्या सोसायटीचे कमिटी सदस्य आहेत. दर महिन्याच्या १५ तारखेला ते सर्वाकडून इमारतीचा देखभाल खर्च गोळा करत असत. मंगळवारी १५ तारीख असल्याने ते सर्वाच्या घरी जाऊन पैसे गोळा करत होते. यावेळी भूमी ही त्यांच्या मागे फिरत होती.
विनोद पाटील यांनी चौथ्या मजल्यापासून सुरुवात केली. ते दुसऱ्या मजल्यावर आले असताना हा अपघात घडला. त्यावेळी भूमी तिसऱ्या मजल्यावर होती. अचानक झालेल्या आघाताने विनोद पाटील यांनी शेजाऱ्यांना इमारत खाली करण्यासाठी मदत केली. या गडबडीत भूमी ढिगाऱ्याखाली सापडली आणि तिचा मृत्यू झाला.
भिंतीत ४५ कुटुंबांचा संसार अडकला
मंगळवारी रात्री अचानक सारा प्रकार घडला असल्याने रहिवाशांना आपला जीव वाचवण्यात यश आले असले तरी त्यांचा संसार मात्र अजूनही त्या मोडकळीस आलेल्या इमारतीत अडकला आहे. दुर्घटना झाल्यानंतर तात्काळ रहिवासी बाहेर पडले. पैसे, दागदागिने तसेच घरात पडले आहेत. सर्वच वस्तू घरातच अडकून पडल्याने सर्वच कामे थांबली आहेत. पिण्याच्या पाण्यापासून कपडय़ापर्यंत सर्वच वस्तूंची गरज निर्माण झाली आहे. आता पुढे काय होणार, घरातील सामान कसे बाहेर काढणार, सामान काढून कुठे ठेवणार असे सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत. यामुळे केवळ रस्त्यावर उभे राहून रहिवासी आपल्या घराकडे पाहात अश्रू गाळत आहेत.
ही इमारत ग्रामपंचायत काळातील आहे. त्याला ग्रामपंचायतीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे. सध्या पालिकेकडून इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे काम चालू केले आहे. त्याच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. इमारतीचे सर्व अहवाल पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची राहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय महपालिका करणार आहे. – किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महपालिका