डोंबिवली: पदपथावर फटाके विक्री मंच लावल्यामुळे पादचाऱ्यांना येण्यास जाण्यास त्रास होतो. त्यामुळे फटाके विक्री मंच काढण्याची सूचना एका विक्रेत्याला करताच, विक्रेत्याने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने रहिवाशाला आपल्या कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत या रहिवाशाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत हा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी जखमी झालेले रहिवासी नितीन ढवळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ढवळे भोईरवाडी परिसरात राहतात.

हेही वाचा >>>कथोरेंसाठी कदाचित मी महत्त्वाचा नसेन, म्हणून मला आमंत्रण नव्हतं; आमदार किसन कथोरेंबाबत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य

रविवारी रात्री तक्रारदार नितीन ढवळे एका पोळीभाजी केंद्रात पदपथावरून चालले होते. त्यावेळी विलास बेळंके यांच्या इस्टेट एजन्सी कार्यालयासमोरील पदपथावर विलास यांचा मुलगा अथर्व बेळंके (कोल्हापुरे) यांनी दिवाळी निमित्त फटाके विक्रीचा मंच लावला आहे. फटाके विक्री मंचामुळे पदपथ व्यापला आहे. यामुळे नागरिकांना येथून येण्यास अडथळा होत असल्याचे आणि मंच तेथून काढण्याची सूचना नितीन ढवळे यांनी विक्रेते अथर्व यांना केली.

ढवळे यांच्या सूचनेचा अथर्व बेळंके यांना राग आला. अथर्व यांनी ढवळे यांना तेथून निघून जाण्यास सांगितले, अन्यथा कार्यालयात नेऊन तुम्हाला मारीन, असा इशारा दिला. अथर्व यांनी नितीन यांना हाताला पकडून स्वताच्या जवळील कार्यालयात नेले. तेथे त्यांचे तीन मित्र आले. चौघांनी मिळून नितीन ढवळे यांना पाईप, लाथाबुक्की, अंगावर खुर्ची फेकून बेदम मारहाण केली. या मारहाणीत नितीन यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. चार जणांच्या ताब्यातून सुटका करून घेत ढवळे यांनी विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले. चार जणांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

हेही वाचा >>>राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

कल्याण डोंबिवली पालिका कर्मचारी यावेळी विधानसभा निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्याचा गैरफायदा घेत पालिकेच्या परवानग्या न घेता कल्याण, डोंबिवली शहरात रस्तोरस्ती पदपथ, मुख्य वर्दळीचे रस्ते अडवून विक्रेत्यांनी फटाके विक्रीचे मंच लावले आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही. बहुतांशी मंचांना काही राजकीय मंडळींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असुनही वाहतूक पोलीस किंवा पालिका कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नसल्याचे समजते.