पावसाळ्यापूर्वी इमारतीच्या दुरुस्तीस रहिवाशांना परवानगी
वसई : वसईतील पूरस्थितीची समस्या लक्षात घेता भविष्यात पुराचे संकट टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरांतील नाल्यांची सफाई, रेल्वे नाल्यांची स्वच्छता यासह इतर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यास सअसून ३० पर्यंत ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.
वसई विरार शहरात मागील दोन वर्षांपासून वसईच्या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पुरामुळे वीजपुरवठा खंडित झाला, ट्रेन बंद पडल्या, तसेच शहरातील अनेक भागांत पाणी जाऊन कोटय़ावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते अशी समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या सभागृहात नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या आढावा बैठकीत सर्व प्रभागातील नालेसफाई कामे, तसेच रेल्वे कलव्हर्ट सफाई प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असून शहरातील विविध ठिकाणी नालेसफाईच्या कामालाही युद्ध पातळीवर सुरवात आहे.
नालसफाई सोबतच महसूल , एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग व बंदरे विकास यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कामांना गती देण्यासाठी त्वरित पत्रव्यवहार करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. याशिवाय पालिका हद्दीतील रस्तेकामांना सुरुवात केली जाणार आहे. सध्या करोनाचे संकट असल्याने विविध प्रकारच्या विकास कामामध्येही अडथळे निर्माण झाले आहेत. परंतु ती कामे टाळेबंदी पूर्वी सुरू होऊन बंद पडलेली घरे, इमारती व इतर आवश्यक दुरुस्तीसाठी परवानगी देऊन ती कामे ही लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा कसा मिळेल यासाठी पालिकेच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
इमारत दुरुस्तीसाठी परवानगी
वसई-विरार शहरातील बहुतेक ठिकाणच्या इमारती, घरे आणि शालेय संस्था फार जुन्या आहेत. पावसाळ्यात काही इमारतींतून पाण्याची गळती होत असते त्यामुळे रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्या निर्माण होऊ नये म्हणून टाळेबंदीतही पावसाआधी गिलावा, वॉटरप्रुफिंग अशा विविध प्रकारच्या दुरुस्तीच्या कामाला पालिकेने परवानगी दिली असून याबाबत पालिका आयुक्त डी. गंगाधरन यांनी परिपत्रक जारी केले.