लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: ठाकुर्ली पूर्वेतील नव्याने नागरी वस्ती झालेल्या भागात मोकळ्या जागेत एक श्वान संगोपन केंद्र आहे. या केंद्रातील कुत्री सतत भुंकत असल्याने बालाजी आंगण परिरातील सोसायट्यांमधील रहिवासी त्रस्त आहेत. पालिका, पोलीस, नगरसेवकांडे तक्रार करुनही कोणीही या विषयाची दखल घेत नसल्याने दाद मागायची कुठे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा आहे.

डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील खंबाळपाडा, चोळेगाव, ठाकुर्ली भागात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. शहरी गजबजाटाला कंटाळलेले अनेक रहिवासी या नवीन गृहसंकुलांमध्ये राहण्यास आले आहेत. एक शांत, लगत उल्हास खाडी किनारा अशा रमणीय वातावरणाचा आनंद रहिवासी घेत आहेत. या भागातील रहिवाशांना बालाजी आंगण परिसरात मोकळ्या जागेत असलेल्या एका श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या भुंकण्यांचा खूप त्रास होत आहे, अशा तक्रारी या भागातील अनेक रहिवाशांनी केल्या आहेत.

हेही वाचा… फलाटांवरील पंखे सकाळच्या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याने प्रवासी घामाघूम

अनेक रहिवाशांना नोकरीवर पहाटेच्या वेळेत जावे लागते. असे रहिवासी रात्री नऊ वाजताच झोपी जातात. त्यांना बाजुला असलेल्या श्वानांच्या भुंकण्यांचा त्रास सहन करावा लागतो. मध्यरात्री निवांतपणा झाला की परिसरात शांतात असते. आजुबाजुला कोठेही कुत्री भुंकू लागली की संगोपन केंद्रातील कुत्रीही एकाचवेळी भुंकू लागतात. असे प्रकार नियमित होतात. ६० हून अधिक श्वान संगोपन केंद्रात असण्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली.
हे संगोपन केंद्र एक महिला चालविते. या महिलेला भेटण्याचा प्रयत्न अनेक रहिवासी करतात. तेथील कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि ते चावले, पाठीमागे लागले तर काय करायचे, या भीतीने कोणीही रहिवासी या केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही.

हेही वाचा… संकेतस्थळावरील चुकीच्या अनुक्रमांकामुळे कल्याण रेल्वे स्थानकात इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना प्रवाशांची तारांबळ

श्वान पत्र्यांच्या निवाऱ्यामध्ये असतात. त्यांना आजुबाजुला गाई, बैल, म्हैस असा कोणताही प्राणी दिसला की सगळी कुत्री एकावेळी भुंकू लागतात. दिवसापेक्षा रात्री हा त्रास सर्वाधिक होतो, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. अनेक घरांमध्ये लहान बाळे आहेत. आजारी वृध्द आहेत. कुत्र्यांच्या भुंकण्याने त्यांची झोप मोड होते.

हेही वाचा… ठाकुर्लीजवळ लोकलच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

नवीन संकुलातील काही गाळ्यांमध्ये कार्यालये आहेत. तेथील कर्मचारी, दुकानदार श्वानांच्या भुंकण्याने हैराण आहेत. मुका प्राणी असल्याने आपण त्याला काही बोलू शकत नाही, असे या भागातील काही प्राणीप्रेमी नागरिकांनी सांगितले. या केंद्राला परवानगी देण्याचा अधिकारी कल्याण डोंबिवली पालिकेला नाही. असे केंद्र चालवायचे असेल तर त्यासाठी ठाणे येथील प्राणी आणि निसर्ग संस्थेची परवानगी संबंधित श्वान संगोपन केंद्राला घ्यावी लागते, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. ठाकुर्लीतील श्वान संगोपन केंद्राच्या चालक महिलेला अनेक वेळा संपर्क केला. त्यांना लघुसंदेश पाठविले, पण त्याला प्रतिसाद दिला नाही.

अशी केंद्र शहराच्या एका बाजुला मनुष्य वस्ती नसलेल्या भागात असायला हवीत. नागरिकांना या केंद्रांपासून कोणताही त्रास होता कामा नये, याविषयी प्राणीमित्रांचे एकमत आहे. ठाकुर्लीतील श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास किती दिवस सहन करायचा या विचाराने रहिवासी चिंताग्रस्त आहेत. लाखो रुपये देऊन ठाकुर्ली भागात घरे घेतली आहेत. या ठिकाणी कायमस्वरुपी असा त्रास असेल तर काही रहिवासी घरे बदलण्याच्या निर्णयापर्यंत गेली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents are disturbed due to the barking of dogs at the dog breeding center in thakurli dvr