डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या वाढल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पादचाऱ्याला भुरळ घालून त्याच्या जवळील मोबाईल, किमती ऐवज लुटणे, गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणे असे प्रकार वाढल्याने पोलिसांनी ठाकुर्ली, कोपर पूल भागातील गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा >>> कोपरीतील पाणी टंचाईची समस्या लवकरच सुटणार ; जुन्या आणि नव्या जलवाहिन्यांच्या जोडणी नसल्यामुळे जाणवतेय पाणी टंचाई
आतापर्यंत डोंबिवली पूर्व भागात भुरट्या चोऱांचा सुळसुळाट होता. चोऱ्या केल्यानंतर त्यांना पळण्यासाठी अनेक रस्ते आहेत. डोंबिवली पश्चिमेत चोरी केल्यानंतर त्यांना कोपर उड्डाण पूल आणि ठाकुर्ली उड्डाण पूल ही दोनच पळण्यासाठी साधने आहेत. बहुतांशी भुरटे चोर हे पत्रीपुला जवळील झोपडपट्टी, आंबिवली, शहरा लगतच्या झोपड्यांमध्ये राहतात. त्यामुळे विष्णुनगर पोलिसांनी कोपर, ठाकुर्ली पूल भागात, पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात गस्त वाढविली तर भुरट्या चोऱ्यांना पकडणे पोलिसांना शक्य होणार आहे, असे जाणकारांनी सांगितले. सोमवारी संध्याकाळी दुचाकी वरुन आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी एका गृहिणेच्या गळ्यातील एक लाख २६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र गळ्यातून हिसकावून लुटून नेले आहे. पोलीस गणपती विसर्जनात व्यस्त असताना चोरट्यांनी बाजारपेठेत महिलेला लुटले.
हेही वाचा >>> डोंबिवली : खंबाळपाडा भोईरवाडीतील रस्त्यासाठी २०१४ मध्ये चार कोटी मंजूर ; रहिवाशांचा अजूनही खड्ड्यातून प्रवास
सुचिता सदानंद पवार (५५, रा. व्हीनस इमारत, दिनदयाळ रस्ता, डोंबिवली) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. सुचिता सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान घरुन पायी निघून डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील एलोरा, एव्हरेस्ट सोसायटी जवळून बाजारात खरेदीसाठी चालल्या होत्या. रस्त्याच्या कडेने जात असताना पाठीमागून अचानक एक दुचाकी वेगाने सुचिता यांच्या अंगावर आली. त्या सावरुन बाजुला उभ्या राहत असतानाच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भुरट्या चोराने सुचिता यांच्या गळ्यातील मंगळसुत्रावर झडप मारुन ते हिसकावले. मंगळसूत्र हातात येताच दुचाकी स्वार सुसाट वेगाने पळाले. सुचिता यांच्या गळ्याला इजा झाली आहे. सुचिता यांनी चोर चोर ओरडा केला. तोपर्यंत भुरटे पळून गेले होते. दुचाकीवरुन मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावण्याचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सुचिता यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.