डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका येथील रस्ते कामासाठी खोदण्यात आलेली माती, दगड बाजुच्या नाल्यात पडली आहे. हा नाला मातीने भरुन गेल्याने एमआयडीसीतून वाहून येणारे सांडपाणी विको नाका भागात जागोजागी तुंबून राहत असल्याने गोळवली, विको नाका परिसरात राहत असलेले रहिवासी, व्यापारी, हाॅटेल चालक हैराण आहेत.अनेक दिवसांपासून अतिशय उग्र दर्प स्वरुपाची दुर्गंधी येऊन एमआयडीसी, एमएसआरडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याविषयी आक्रमक भूमिका घेत नसल्याने गोळवली परिसरातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

कल्याण शिळफाटा रस्त्या लगतचा डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी टेम्पो नाका, माथाडी कामगार, कामगार यांची सर्वाधिक वर्दळ असते. ही मंडळी या दुर्गंधीने हैराण आहेत. गोळवली गावचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांनी विको नाका भागात रस्ते काम करणाऱ्या ठेकेदाराला नाल्याचा आकार मोठा आणि प्रवाह ज्या ठिकाणी तुंबला आहे तो साफ करण्याची मागणी वारंवार केली. त्यावेळी ठेकेदाराने हे आमचे काम नाही, असे उत्तर पाटील यांना दिले. एमआयडीसीच्या अंतर्गत भाग येतो. तेही या महत्वाच्या विषयावर काही करत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : रेल्वे, ओएनजीसी मध्ये नोकरीला लावतो सांगून कल्याण मध्ये डाॅक्टरची १२ लाखांची फसवणूक

याच भागातून एमआयडीसी अधिकारी नियमित या भागातून येजा करतात. त्यांना लोकांना होणाऱ्या त्रासाची माहिती नाही का, असे प्रश्न रमाकांत पाटील यांनी केले. या महत्वपूर्ण विषयासंदर्भात आपण लवकरच प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले. एमआयडीसीतील उद्योजकांनी आम्ही उघड्या नाल्यातून कंपनीत उत्पादित मालाचे सांडपाणी सोडत नाही. उत्पादित मालाचे सांडपाणी विशिष्ट वाहिन्यांमधून ते सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. तेथून ते प्रक्रिया होऊन मग नाल्याच्या दिशेने सोडले जाते. त्यामुळे विको नाक्या जवळील नाल्याचे तुंबलेले पाणी याच्याशी आमचा काही संबंध नाही. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करुन योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

Story img Loader