डोंबिवली- कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गासाठी निविदा प्रक्रिया जाहीर झाल्याबद्दल आणि हे काम लवकर पूर्ण होण्याचे गोडवे गायले जात असल्याबद्दल डोंबिवली २७ गावांमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. हे समाधान व्यक्त करत असताना या भागातील रहिवाशांनी मेट्रो मार्ग सुरू करण्यापूर्वी २७ गावातील धुळी, खड्ड्यांनी भरलेल्या जमिनीवरील रस्त्यांना थोडे सुस्थितीत करा. नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण यांचे जे खराब रस्त्यांमुळे हाल सुरू आहेत. त्याचा पण थोडा विचार मेट्रो सुरू करण्यापूर्वी करा, असे आर्जव २७ गावांमधील रहिवाशांनी राजकीय मंडळींना केले आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील काँक्रीट रस्त्यांवर पाणी मारले जात नसल्याने रस्त्यांना तडे
२७ गावांमधील ग्रोथ सेंटर मधील संदप, उसरघर, मानपाडा, दिवा परिसरातील रस्त्यांसाठी शासनाने ३२६ कोटीचा निधी ऑगस्टमध्ये मंजूर केला. गेल्या वर्षी १८ डिसेंबरला या रस्त्यांचे भूमिपूजन कल्याण लोकसभेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, मनसेचे आ. प्रमोद पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थानिक शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोषात करण्यात आले. आता दोन महिने उलटले तरी या रस्ते कामांचा अद्याप शुभारंभ करण्यात न आल्याने २७ गावातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झोकुन काम करताय, जरुन करा. पण केवळ विकास आणि विश्वकर्मा म्हणून मिरवण्यापूर्वी प्रत्यक्ष कृतीही महत्वाची आहे, अशी खोचक टीका रहिवासी राजकीय मंडळींवर करत आहेत.
ग्रोथ सेंटर भागातील विकास कामे लवकरच सुरू होतील. या भागातील रहिवाशांना काँक्रीटचे रस्ते उपलब्ध होतील, अशा आणाभाका रस्ते भूमिपूजन कार्यक्रमाच्यावेळी खा. शिंदे यांनी घेतल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांच्या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणखी एक उड्डाणपूल
उपरोधिक टीका
सर्व राजकीय नेत्यांचे मनपूर्वक आभार…आभार..आभार. मानपाडा-संदप-दिवा-उसरघर येथील रस्त्यांचे खडीकरण गालीेचे अंथरुण दिल्याबद्दल तुमचे आभार. या रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिकांच्या फुप्फसामध्ये धुळीची उधळण केल्याबद्दल तुमचे आभार. विद्यार्थी, कामगार, नोकरदार, रुग्ण यांना कधीच वेळेवर पोहचू न देण्याचे वचन पूर्ण केल्याबद्दल तुमचे आभार. या असुविधा देऊन नागरिकांचे जीवन धुळी मिश्रित केल्याबद्दल तुमचे शतशा आभार. साहेबांना मेट्रोत बसून वातानुकूलित सफर तर करायची आहेत. पण या अगोदर जमिनीवर चालण्याजागे वातावरण निर्माण करा, असे आवाहन २७ गावांमधील धुळीमध्ये गुदरमरलेल्या रहिवाशांनी जाहीरपणे केले आहे. समाज माध्यमात सुरू असलेल्या या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे. रहिवाशांचा टीकेचा सर्व रोख या कामांसाठी पुढाकार घेणाऱ्या खा. शिंदे यांच्याच दिशेने आहे.