ठाणे महापालिकेत समाविष्ट होऊन दोन दशकांचा काळ उलटला तरी दिवा शहराच्या समस्या कमी होताना दिसत नाहीत. अतिशय दाटीवाटीने उभी राहिलेली बेकायदा बांधकामे, नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा, भूमाफियांनी बळकावलेले भूखंड अशा चक्रव्यूहामध्ये दिवा शहराचा विकास फसला आहे. दिव्यातील नगरसेवकांची संख्या आता दोनवरून अकरावर गेली. शहराला उपमहापौरपदही मिळाले. त्यामुळे दिव्याचे नष्टचर्य संपून चांगले दिवस येतील, अशी आशा येथील रहिवाशांना वाटत होती. मात्र त्यांच्या आशेवर अक्षरश: पाणी फिरले आहे. महापालिका प्रशासनाने दिव्यासाठी अनेक विकास योजना आखल्या असल्या तरी दुर्दैवाने अद्याप त्या कागदावरच राहिल्या आहेत.
मुंबई-ठाण्यातील अधिकृत घरांच्या वाढत्या किमती दिव्यातील जमिनींवर अनधिकृत चाळींचे पीक फोफावण्यास पोषक ठरल्या. त्यात महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष स्थानिक भूमाफियांच्या पथ्यावर पडले. स्वस्त घरे मिळविण्याच्या नादात हजारो कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदारांनी येथे संसार थाटले. मात्र इथे आल्यावर स्वस्त म्हणून घेतलेले घर प्रत्यक्षात किती महाग आहे, याची प्रचीती त्यांना आली. या स्वस्त घरांची फार मोठी किंमत दिव्यातील रहिवाशांना भोगावी लागत आहे. यंदा नगरसेवकांची संख्या दोनवरून अकरावर गेल्याने दिव्यातील ही दुर्दशा थांबेल, अशी आशा निर्माण झाली. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात दिव्याला विशेष महत्त्व दिले. दिव्यातील अकरापैकी आठ जागा सेनेला मिळाल्या. त्यामुळे उपमहापौरपद देऊन शिवसेनेने दिव्याला आपण महत्त्व देत असल्याचे दाखवूनही दिले. काही विकास योजनांचीही घोषणा झाली. मात्र त्यानंतरच्या पहिल्याच पावसात दिवा आहे तिथेच असल्याचा अनुभव रहिवासी घेत आहेत. दिव्यातील नालेसफाईसाठी एकूण ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात नाल्यांची सफाई झालेली दिसलीच नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात दिवा शहरात ठिकठिकाणी पाणी साचून अनेक नागरिकांच्याही घरात पाणी शिरले.
विजेचा लपंडाव
दिवा शहरात विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असतो. पावसाळ्यात हे प्रमाण वाढते. महावितरणने या भागात विद्युत जनित्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून हे प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर येथील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होऊ शकेल अशी शक्यता आहे. दिवा शहरात पाणी समस्याही मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून अनधिकृत नळजोडण्यांचे जाळेच शहरात पसरले आहे. उन्हाळ्यात काही नागरिक रेल्वेने प्रवास करीत मुंब्रा येथून पाणी आणतात. शहरात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र त्यात पाणी चढविण्यासाठी यंत्रणाच नसल्याने दिवा शहर अद्याप तहानलेलेच आहे. लघुपाटबंधारे विभागाने उन्हाळ्यात शहराला तात्पुरता पाणीसाठा वाढवून दिला होता. मात्र हा अतिरिक्त पाणीसाठा बंद झाल्यानंतर पुन्हा पाण्यासाठी नागरिकांना हाल सहन करावे लागणार आहेत. पालिकेने शहरात नळपाणी योजना राबविण्याचे ठरविले असले तरी प्रत्यक्षात ही कामे पूर्ण कधी होणार हे माहीत नाही.
रस्ते गायब
पावसामुळे दिव्यातील रस्त्यांचीही अक्षरश चाळण झाली आहे. मुंब्रा कॉलनी मार्गावर तर रस्ता अस्तित्वात आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. दीड ते दोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा जलवाहिन्यांचे जाळे असल्याने तेथून चालणेही सहज सोपे नसते. दिवा आगासन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी प्रेरणा टॉवरजवळील रस्त्यावर मोठे खड्डे पाहावयास मिळतात. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर त्या चिखलातून न घसरता चालणे ही प्रवाशांसाठी मोठी कसरतच असते.
महापालिकेने रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत दिवा आगासन रस्त्यामधील आगासन गाव ते कल्याण रोड (शालू हॉटेल) या रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. २ हजार २०० मीटर लांबी व ३० मीटर रुंदी असलेल्या या रस्त्याच्या विकासासाठी १६ कोटी रुपयांचा खर्च होणार असून त्यासाठीच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र आताच्या घडीला हे कामही अद्याप कागदावरच आहे.
प्रवासाचे दिव्य
दिवेकरांना नोकरीनिमित्त दररोज मुंबई दिशेला प्रवास करावा लागतो. सध्या तरी त्यांच्याकडे रेल्वे वाहतुकीशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही. दिव्यातील वाढत जाणारी लोकसंख्या पाहता सकाळ-संध्याकाळ या दिशेला होणाऱ्या लोकलच्या फेऱ्याही कमी पडू लागल्या आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाअंतर्गत रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिका उभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो मार्ग झाल्यास रेल्वे वाहतुकीतील अडथळे कमी होऊन या पट्टय़ात सुमारे १०० फेऱ्या जादा चालविल्या जातील असा अंदाज आहे, मात्र अद्याप हे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही.
जलवाहतुकीचे स्वप्न
मुंबई ते नवी मुंबईदरम्यान जल वाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी होत असताना ठाणे महापालिकेनेही अंतर्गत व बाह्य़ जलवाहतूक प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण सरकारी यंत्रणांकडे करण्यास सुरुवात केली होती. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे- वसई – मीरा-भाईंदर या परिसरात अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्याचे सुतोवाच करत त्याविषयीचा आराखडा तयार केला. या प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी अंदाजे २८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घोडबंदर मार्ग, कोलशेत, साकेत, दिवा असा हा मार्ग असून पुढे भिवंडी – कल्याण या मार्गावरही जल वाहतुकीचे विस्तारीकरण केले जाऊ शकते. या प्रकल्पामुळे दिवेकरांचा प्रवास काहीसा सुकर होईल, असे बोलले जाते. मात्र हा प्रकल्प अद्याप अतिशय प्राथमिक अवस्थेत आहे.
दिवानजीक मोठे गृहप्रकल्प
गेल्या काही वर्षांत ठाण्याच्या पलीकडे आगासन, मुंब्रा, कौसा, दातिवली, कल्याण ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने गृहप्रकल्पांची उभारणी होत आहे. बेकायदा बांधकामांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवा शहराची ही ओळख पुसून काढत काही बांधकाम व्यावसायिकांनी येथील गृहविक्री वाढविण्यासाठी दिव्याचे नामकरण नवी डोंबिवली असे केलेले दिसून येते. ठाणे महापालिकेनेही या प्रकल्पांच्या सोयीसाठी दिवा, दातिवली, डायघर परिसरात नवे रस्ते, उड्डाणपूलांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनानेही म्हाडाच्या माध्यमातून या पट्टय़ात हजारोंच्या संख्येने घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गृहप्रकल्पांच्या उभारणीनंतर महापालिका प्रशासनाने आता येथे नागरी सुविधा मिळवून देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार दिवा येथील आगासन भागात १३.८७ हेक्टरचा भूखंड मध्य रेल्वेसाठी आरक्षित करण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने हा भूखंड अद्याप संपादित केलेला नाही. या भूखंडावरील बहुतेक भाग हा सीआरझेड बाधित असल्याने तिथे बांधकाम करता येत नाही. विकास आराखडय़ातील रस्त्यालगत असलेल्या या भूखंडाच्या आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव महापालिकेने महासभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावास मंजुरीही मिळाली असून त्यानुसार पुढील हालचाली सुरूआहेत.
कचऱ्याचा विळखा
वर्षांनुवर्षे दिव्याला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे ६५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा दिव्यातील मोकळ्या भूखंडावर आणून टाकला जातो. उन्हाळ्यात या कचऱ्याला आगी लागण्याच्या घटना घडतात. या कचऱ्याच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार जडतात. मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी निवडणूक काळात कचराभूमीवर मुक्काम ठोकत आंदोलन केले होते. येथील कचऱ्याची योग्य वासलात लावण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र अजूनही येथेच कचरा आणून टाकला जात आहे.