ठाणे : धूळ, प्रदूषण मुक्त आणि ठाणे स्थानकापासून जवळच राहता यावे यासाठी लाखो रुपये खर्च करून घर घेणाऱ्या घोडबंदरकरांना आता आरएमसी प्रकल्पांचा धोका निर्माण होऊ लागला आहे. हावरे येथे निसर्गाच्या सानिध्यात उभारण्यात आलेल्या प्रकल्पानंतर आता याच भागात एका खासगी विकासकाकडून रहिवाशी क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या आरएमसी प्रकल्पाला येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. हा प्रकल्प इतरत्र हटविला नाही तर आंदोलन उभारु असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात आरएमसी प्रकल्प उभे राहात आहेत. त्यामुळे नागरिकांना आता शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी आंदोलन करण्याची वेळ ओढावली आहे.

घोडबंदर भागात मागील काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. ठाणे स्थानक आणि मुंबई शहराला जोडणारा भाग असल्याने घोडबंदर भागात नागरिकांनी वास्तव्य करण्यास सुरूवात केली. या घोडबंदरच्या एका भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या भागात ठाण्याची विस्तीर्ण खाडी आहे. शहरातील प्रदूषणापासून दूर आणि निरोगी वातावरण जगण्यासाठी अनेकांनी घोडबंदर पट्ट्यात गृहखरेदी केली. परंतु आता हाच घोडबंदर पट्टा प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागला आहे. या भागात सरकारी प्रकल्प किंवा खासगी विकासकांकडून सुरू असलेले गृहप्रकल्प यांसाठी आरएमसी प्रकल्प उभारणीचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे येथील रहिवासी आता त्रस्त झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच हावरे गृहसंकुलालगत ठाणे- बोरीवली भुयारी मार्गासाठी उभारण्यात आलेल्या आरएमसी प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, आता याच भागातील बोरीवडे या गावात एका खासगी विकासकाने आरएमसी प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. हा प्रकल्प सुरू झाला नसला तरी प्रदूषणाचा धोका असल्याने नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा प्रकल्प सुरू करू नका अशी मागणी रहिवासी करत आहेत.

या भागात रौनक डिलाईट, विहंग्स व्हॅली फेज १, २, प्लाटीनम लाॅन्स, रौनक हाईट्स एच १, उन्नती ग्रीन जी १ ते ४ या मोठ्या गृहसंकुलातील इमारती आहेत. तसेच गावातील लोकवस्ती देखील या भागात आहे. सुमारे पाच ते आठ हजार इतकी लोकवस्ती या भागात आहे. रविवारी येथील रहिवाशांनी एकत्र येऊन कासारवडवली पोलीस ठाण्यात निवेदन दिले. तसेच यापूर्वी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाने जर याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

हा आरएमसी प्रकल्प सुरू झाल्यास प्रदूषणाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागणार आहे. आम्ही प्रशासनास पत्रव्यवहार करत असून रविवारी पोलिसांना निवेदन दिले आहे अशी माहिती येथील शिवसेनेचे (शिंदे गट) विभागप्रमुख रवि घरत यांनी सांगितले. प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येथे मोठ्याप्रमाणात लोकवस्ती आहे. अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलन पुकारले जाईल असे येथील रहिवासी प्रेम शेळके यांनी सांगितले.

प्रदूषण मुक्त व्हावे यासाठी येथे गृहखरेदी केली. परंतु आता निर्माणाधीन कामांमुळे धूळ आणि प्रदूषणाच्या समस्येमुळे रहिवासी हैराण झाले आहे. त्यातच आरएमसी प्रकल्प सुरू केल्यास प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही रहिवासी आरएमसी प्रकल्पाला विरोध करत आहोत. – मंगेश कदम, रहिवासी.

या प्रकल्पाची पाहणी केली. संबंधित विकासकाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा केवळ आरएमसी बांधकाम परवाना होता. तो सुरू करण्याचा परवाना नाही. त्यामुळे हा प्रकल्प बंद आहे. – मनीषा प्रधान, विभागप्रमुख, प्रदूषण नियंत्रण विभाग, ठाणे महापालिका.

संबंधित आरएमसी संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. आरएमसी प्रकल्प कार्यान्वित करताना सरकारचे नियम आहेत. त्या नियमांचे पालन संबंधित आरएमसी प्रकल्पात झाले नसल्यास त्या प्रकल्पाला कार्यान्वित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. – आनंद काटोळे, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Story img Loader