ठाणे: पूर्व द्रुतगती महामार्गालगत आनंदनगर जकातनाका येथे कोपरीच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी धोकादायकरित्या महामार्ग ओलांडून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. या जीवघेण्या प्रवासामुळे प्रत्येक दोन दिवसांत अपघातांची मालिका सुरू झाली आहे. हा प्रकार जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षांपासून येथील नागरिक एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार करत आहेत. परंतु कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच येथील जकातनाक्यावर एमएमआरडीएने एक टोलनाका उभारला आहे. या टोलनाक्यावर येणारी वाहनेही बेशिस्त पद्धतीने वाहतूक करत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. येथील गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी स्वाक्षरी अभियान सुरू केले असून अवघ्या तीन दिवसांत दोन हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण भागातून हजारो नागरिक या महामार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असतात. येथील आनंदनगर जकातनाकाजवळ हरिओमनगर आणि कोपरी येथील बाराबंगला भागाचा परिसर आहे. यातील हरिओमनगर हा मुंबई महापालिकेच्या हद्दीचा भाग आहे. तर बाराबंगला भाग ठाणे महापालिकेच्या हद्दीत आहे. हरिओमनगर परिसरात २६ इमारती असून सुमारे ३५ हजार रहिवासी या भागात राहातात. बाराबंगला परिसरातही मोठी लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना महामार्गावरून कोपरी, हरिओमनगर परिसरात जाण्यासाठी आनंदनगर जकातनाका समोरील दुभाजकातून रस्ता ओलांडून वाहतूक करावी लागते. परंतु हा रस्ता ओलांडण्याचा प्रकार आता जीवघेणा ठरू लागला आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे वळण रस्त्यावरून रस्ता ओलांडताना भीषण अपघात होण्याची शक्यात आहे.

हेही वाचा… लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी पोस्ट खात्याने घेतला महत्त्वाचा निर्णय

बहुतांश वेळी येथे पोलीस किंवा सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसतात. परिसरातील रिक्षा चालक देखील जीव मुठीत घेऊन रिक्षा चालवित असतात. मुलुंड टोलनाका परिसरात वाहनांचा भार वाढू लागल्याने आनंदनगर जकातनाका येथे एक टोलनाका उभारला आहे. त्यामुळे या टोलनाक्यावरही वाहने वाहतूक करू लागल्याने वाहतुकीची बेशिस्ती वाढली आहे. हरिओमनगर परिसरातील हरिओमनगर ॲपेक्स बाॅडी फेडरेशन को. ऑ. (होनाफे) या गृहसंकुलाच्या संस्थेने स्थानिक खासदार, एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेकडे सातत्त्याने पाठपुरावा केला आहे. संस्थेचे अध्यक्ष साहेबराव सुरवडे आणि सचिव हेमंत पमनानी यांनी सांगितले की, स्थानिक खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटचा यांनी पाठपुरावा केला. मंत्री दादा भुसे यांनी देखील पाहणी करत मुद्दा वरिष्ठ पातळीवर नेला आहे असे त्यांनी सांगितले. तर, वळण रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात सिग्नल यंत्रणा आणि भुयारी मार्ग तयार करण्यात यावा असे मधुसूदन गुट्टी यांनी सांगितले.

हरिओमनगर परिसरातील समस्येविषयी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांची भेट घेतली होती. तसेच महापालिकेला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. – मनोज कोटक, खासदार.

महामार्ग ते हरी ओमनगर असा प्रवास करताना प्रत्येक दिवस धोकादायक असतो. आम्ही घेतलेल्या स्वाक्षरी मोहीमेत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. – आर. के. चिदंबरम, होनाफे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents of hariomnagar kopri have to travel dangerously across the highway which is leading accidents dvr
Show comments