लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: कल्याण पश्चिमेतील वाडेघर भागातील २५० कुटुंब राहत असलेल्या एका गृह प्रकल्पाच्या शेजारी कल्याण डोंबिवली पालिकेने स्मशानभूमी उभारण्याचे काम हाती घेतल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. हे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांकडे केली आहे.

अशाच पध्दतीचा वाद गेल्या दीड वर्षापासून डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील खंबाळपाडा गाव हद्दीत सुरू आहे. या ठिकाणी पालिकेच्या नगररचना विभागाने गावच्या पूर्वपरंपरागत स्मशानभूमीच्या जागेवरुन रस्ता रेषा दाखविली. ती स्मशानभूमी नियमबाह्य रेल्वे हद्दीत स्थलांतरित करुन तेथे उभारणीचे काम सुरू केले आहे. एका विकासकाच्या प्रकल्पासाठी वाहनतळ, स्मशानभूमी आरक्षणाचे एकत्रिकरण केल्याचे दाखविण्यात आले आहे. हा सगळा व्यवहार पालिका अधिकाऱ्यांनी शासनाला अंधारात ठेऊन करण्यात आल्याच्या तक्रारी शासन, पालिकेकडे काही जागरुक नागरिकांनी केल्या आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत शनिवारी परशुराम पालखी सोहळा

वाढती नागरी वस्ती, घरांच्या किमतीप्रमाणे रहिवाशांनी आपल्या सोयीप्रमाणे कल्याण, डोंबिवली परिसरात गृहप्रकल्पांमध्ये घरे खरेदी केली आहेत. काही गृहप्रकल्पांच्या शेजारी स्मशानभूमीची आरक्षणे आहेत. हे सुरुवातीला रहिवाशांच्या विकासकाने निदर्शनास आणले नाही. आता या प्रस्तावित गृहप्रकल्पांच्या शेजारील स्मशानभूीच्या जागेत पालिकेने स्मशानभूमी उभारण्याची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे आयुष्याची पुंजी घर खरेदीत गुंतविलेला रहिवासी अस्वस्थ झाला आहे.

हेही वाचा… दुर्घटनेची जबाबदारी अप्पासाहेबांवर ढकलण्याचे राज्य सरकारचे कारस्थान; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

वाडेघर मध्ये साई शरणम सोसायटीमध्ये २५० कुटुंब राहतात. वाडेघर परिसरात सुमारे दोन हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. या वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी स्मशानभूमी उभारली आणि ती कितीही अद्ययावत असल्याचा दावा पालिकेने केला तरी या रस्त्यांवरुन शाळकरी मुले नियमित ये-जा करणार आहेत. बालमनावर या गोष्टीचा विपरित परिणाम होऊ शकतो हा विचार करुन पालिकेने तातडीने या स्मशानभूमीचे काम थांबवावे, असे आवाहन रहिवाशांनी केले आहे.

हेही वाचा… ठाण्यात अग्निशमन दाखला केवळ हप्ता घेण्यापुरता मर्यादीत; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

साई शरणम सोसायटीच्या एका बाजुला पूर्वीपासून एक स्मशानभूमी अस्तित्वात आहे. पुन्हा याच भागात नवीन स्मशानभूमी उभारणीचे प्रयोजन काय, असा प्रश्न रहिवाशांनी केला आहे. या भागात स्मशाभूमी होता कामा नये आणि हे काम पालिकेने रेटून करण्याचा प्रयत्न केला तर रहिवासी प्रस्तावित स्मशानभूमी समोर बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

डोंबिवलीतील खंबाळपाडा ९० फुटी रस्त्यावर पालिकेच्या वाहनतळ, स्मशानभूमी आरक्षणाच्या जागा पालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांनी एका विकासकाच्या सोयीसाठी शासनाला अंधारात ठेऊन बदलल्या आहेत. हे बदलाचे अधिकारी पालिका अधिकाऱ्यांना दिले कोणी, असे प्रश्न एका जागरुक नागरिकाने तक्रारीतून नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना उपस्थित केले आहेत. खंबाळपाडाची स्मशानभूमी प्रथमेश सोसायटीला जवळ उभारण्यात येत आहे. गेल्या वर्षापासून रहिवासी या स्मशानभूमीच्या विरोधात आवाज उठवित आहेत. त्याचा दखल प्रशासन, लोकप्रतिनिधी घेत नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

“ वाडेघर येथील स्मशानभूमीचे काम मागील वर्षीच प्रस्तावित केले आहे. हे काम आता सुरू केले आहे. या कामाला रहिवाशांनी विरोध केल्याने ते थांबविण्यात आले आहे. रहिवाशांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल.” – अर्जुन अहिरे, शहर अभियंता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents protest as kalyan dombivli municipality undertakes construction of crematorium adjacent to housing project at wadeghar in kalyan dvr