डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर मधील एक रहिवाशाकडे शेजाऱ्याच्या एका तरुणाने गुटका खाण्यास मागितला. आपण गुटका खात नाही. आपल्या जवळ गुटका नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने रहिवाशावर धारदार चाकुने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री ही घटना घडली. स्वतंत्रसिंग सिंग (३०, रा. सिताबाई चाळ, त्रिमूर्तीनगर, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते सुतारकाम करतात. अजय बलवीर बोथ (२२, रा. त्रिमूर्तीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा : कल्याण मधील कोळसेवाडीत बेरोजगार मुलाकडून आईचा खून
रामनगर पोलिसांनी सांगितले, स्वतंत्रसिंग हे रात्री नऊ वाजता भोजन झाल्यानंतर त्रिमूर्तीनगर मधील आपल्या घराबाहेर फेऱ्या मारत होते. यावेळी तेथे त्यांच्या ओळखीतील एक शेजारी अजय बोथ आला. त्याने स्वतंत्रसिंग यांना थांबवून तुमच्या जवळ गुटका आहे ना. तो खाण्यासाठी द्या अशी आग्रहाने मागणी केली. सिंग यांनी आपण गुटका खात नाही. आपल्या जवळ गुटका नाही. गुटक्यावर शासनाची बंदी असल्याने तो कोठे मिळत नाही, असे अजयला सांगितले.
सिंग यांच्या या बोलण्याचा अजयला राग आला. यातूनच त्याने चाकूने सिंग यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात सिंग गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात नेले. तोपर्यंत अजय घटनास्थळावरुन पळून गेला होता. सिंग यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फरार अजयचा शोध सुरू केला आहे.