कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरांच्या विविध भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून ते पहाटेपर्यंत डासांचा उपद्रव होत असल्याने नागरिक हैराण आहेत. डासांचे थवेच्या थवे संध्याकाळच्या वेळेत घरात घुसतात. डास प्रतिबंधक कितीही उपाययोजना केल्या तरी डास घरातून निघत नाहीत. रस्त्यावर उभे राहिले तरी चारही बाजुने डास हल्ला करतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
उघडी गटारे, नाले भागात डासांचे प्रमाण अधिक आहे. शहराच्या विविध भागात इमारत उभारणीची कामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठवणीसाठी उघड्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणीही डासांचा उपद्रव अधिक आहे. चाळी, झोपडपट्टी भागात डासांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी दर महिना, पंधरा दिवसांनी प्रत्येक प्रभागात सकाळच्या वेळेत मिनी ट्रॅक्टरव्दारे, संध्याकाळच्या वेळेत जीपच्या माध्यमातून पालिकेकडून धूर फवारणी केली जात होती. पाठीवर पंप घेऊन पालिका कामगार चाळी, झोपडपट्ट्या, इमारतींंमध्ये जाऊन डास प्रतिबंधक फवारणी करायचे. हे प्रकार अलीकडे कमी झाले आहेत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत बेदरकारपणे मोटार, दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई; नाकाबंदीसाठी ६१७ पोलीस तैनात
दोन दोन महिने पालिकेची फवारणीची यंत्रणा फिरकत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच डासांचे प्रमाण वाढल्याचे नागरिक सांगतात. डासांचे प्रमाण वाढवुनही पालिकेकडून नियमित धूर फवारणी केली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. चहाचे ठेले, वडपाव, पाणीपुरीच्या गाड्यांसमोर उभे राहणारे ग्राहकही डासांनी हैराण आहेत. रस्त्यावर उभे असताना हातामधील चहा प्यायचा, वडापाव खायचा की डास मारत बसायचे, असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत. खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थी, शिक्षकांनाही डासांचा सामना करावा लागतो.
हेही वाचा >>> मधमाशांच्या हल्ल्यामुळे येऊरच्या जंगलात अडकलेल्या १० तरुणांची सुटका; तीघे गंभीर जखमी
इमारतीवर काम करणारे, राहुट्यांमध्ये राहणाऱ्या मजुरांनाही डासांचा उपद्रव होत आहे. नागरिक डासांनी हैराण असताना पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
डास प्रतिबंधासाठी पालिकेची १७५ कामगारांची स्वतंत्र टीम आहे. धूर फवारणी जीपव्दारे, ट्रॅक्टरच्या माध्यमातून, पाठीवरील हात पंपाव्दारे नियमित केली जात आहे. नागरिकांच्या तक्रारीप्रमाणे ही फवारणी केली जात आहे. प्रभागस्तरावरील स्वच्छता निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली ही फवारणी केली जाते. अतुल पाटील उपायुक्त, घनकचरा विभाग.