काँग्रेसचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते पदाचा आयुक्तांकडे राजीनामा सोपवला. गेल्या आठवडय़ात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विश्वनाथ राणे यांना विरोधी पक्षनेते पदावर कायम ठेवावे यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रसंग घडला होता. शिवसेनावासी झालेले राणे अद्याप विरोधी पक्षनेते पदाला का चिकटून आहेत, असा सवाल उपस्थित होत होता. अखेर त्यांनी पदाचा राजीनामा आयुक्त ई.रवींद्रन यांच्याकडे सुपूर्द केला आहे.काँग्रेस पक्षाने हकालपट्टी केलेली नाही, तसेच पक्षातून काढून टाकल्याचे पत्रही दिलेले नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेतेपद भूषवू शकतो, असा राणे यांचा दावा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा खांद्यावर घेतल्यानंतरही आपण अजूनही काँग्रेसमध्ये असल्याचे राणे सांगत होते. असे असताना आक्रमक झालेल्या काँग्रेस नगरसेवकांनी राणे यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी राखीव असलेल्या आसनावर बसण्यास मज्जाव केला होता. तरीही राणे आणि शिवसेनेचे नगरसेवक या पदासाठी भलतेच आग्रही असल्याचे चित्र होते. या मुद्दय़ावरून सर्वसाधारण सभेत राणे आणि नवीन सिंग यांच्यात जोरदार बाचाबाची आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले होते. महापालिका निवडणुकीमुळे येत्या काळात तातडीच्या सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नगरसेवकांकडून राणे यांच्या विरोधात गदारोळ करण्याची व्यूहरचना आखली होती. या गदारोळात महत्त्वाचे नागरी विकासाचे विषय रखडतात किंवा नाहक सभागृहाचा वेळ जातो. त्यामुळे राणे यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा करून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.