किशोर कोकणे

गावंडबागच्या फुटबॉल पार्कला रहिवाशांचा विरोध; मैदान वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

ठाणे महापालिकेतर्फे ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या टर्फ फुटबॉल पार्कला गावंडबाग, शिवाईनगर, उपवन येथील नागरिकांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. फुटबॉल पार्कमुळे या मैदानात दररोज विविध खेळ खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंचे हक्काचे मैदान नाहीसे होईल व त्यांना येथे खेळण्यासाठी शुल्क मोजावे लागेल, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे. या पार्कविरोधात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

गावंडबाग येथील धवल हिल्ससमोर महापालिकेचे ११ हजार २४७ चौ. मीटर इतके मोठे मैदान आहे. या मैदानावर काही महिन्यांपासून टर्फ पार्क बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मैदानावर खेळण्यासाठी उपवन, कोकणीपाडा, गावंडबाग या परिसरातील शेकडो खेळाडू येत असतात. आधीच शहरात मैदाने नसताना खासगी भागीदारीतून टर्फ फुटबॉल पार्क बनविल्यास खेळण्यासाठी कुठे जायचे असा प्रश्न येथील खेळाडू विचारत आहेत. गावंडबाग येथे राहणारे अविनाश मौळे आणि अखिलेश बावस्कर हे दररोज आपल्या मित्रांसोबत या मैदानात क्रिकेट खेळतात. मैदानात त्यांनी मेहनत करून खेळपट्टीही तयार केली होती. मात्र, गेल्या १० दिवसांपासून या मैदानातील दिवे काढण्यात आले असून संपूर्ण मैदानच उखडलेले आहे. त्यामुळे आता त्यांना रस्त्यावर खेळावे लागत आहे, अशी तक्रार त्यांनी केली.

याच परिसरात राहणाऱ्या वरद पाटणकर, गणेश महाले आणि राकेश राऊत यांनीही मैदान नसल्याबाबतची खंत ‘लोकसत्ता’कडे बोलून दाखविली. महापालिकेचे या मैदानाकडे संपूर्ण दुर्लक्ष होते. येथे बसणाऱ्या गर्दुल्ल्यांना हकलण्यापासून ते मैदानातील साफसफाईचा खर्च आम्ही करत होतो, असे त्यांनी सांगितले. मैदानात टर्फ फुटबॉल पार्क तयार झाल्यास त्याचे प्रवेश शुल्क वेगळे असणार आहे. त्यासोबतच खेळ खेळण्यासाठी तासाचे पैसे आकारले जातील. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही, असे शिवाई नगर येथे राहणाऱ्या जिल्हा पातळीवरील फुटबॉलपटूने सांगितले.

यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही तर, क्रीडा विभागाच्या प्रमुख मीनल पालांडे यांचाही दूरध्वनी बंद होता.

टर्फ फुटबॉल पार्क तयार झाल्यास खेळण्यासाठी जागा राहणार नाही. त्यामुळे काही दिवसांपासून आम्ही खेळाडू एकत्र येऊन शिवाई नगर, गावंडबाग, उपवन भागातील घरा-घरांमध्ये जाऊन टर्फ फुटबॉल पार्कविरोधात सह्य़ांची मोहीम घेत आहोत. हे सह्य़ांचे पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात येईल.

– सुयश टाक, खेळाडू

Story img Loader