डोंबिवली दिवा पूर्व, पश्चिम भागाचे नागरीकरण झाले आहे. मुंबई परिसरातून नागरिक याठिकाणी राहण्यास आले आहेत. शिळफाटा भागातील नागरिक, नोकरदार दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. या वाढत्या प्रवासी संख्येमुळे दिवा रेल्वे स्थानकातील प्रवासी समस्या तातडीने मार्गी लावा, अशी मागणी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांच्याकडे केली.
दिवा रेल्वे स्थानकांत पाण्याची सुविधा नाही. या स्थानकातून कोकण, बाहेरील भागातून रेल्वे गाड्यांची येजा असते. स्थानकात उतरल्यानंतर त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. स्वच्छता गृहांकडे दुर्लक्ष होत आहे. तेथे मुबलक २४ तास पाणी उपलब्ध करुन द्यावे. स्थानकातील काही भागात छत नसल्याने प्रवाशांना उन, पावसाच्या वेळी आडोसा घेऊन उभे राहावे लागते. रेल्वे स्थानक भागात अपघात झाल्यास रुग्णवाहिकेसाठी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागते. याठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात यावा. दिवा पूर्व भागात रेल्वे स्थानका जवळ तिकीट खिडकी सुरू करावी. आता प्रवाशांना पश्चिमेत जाऊन तिकीट खरेदी करावे लागते. दिवा स्थानकात हमाल नसल्याने लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमधून येणाऱ्या प्रवाशांचे सामान उचलताना हाल होतात. आगासन, दातिवली रेल्वे फाटकातील आणि पोहच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. हे रस्ते सुस्थितीत करण्यात यावेत. दिवा-पनवेल, वसई रोड, पनवेल-रोहा रेल्वे मार्गावरील पॅसेंजरचे बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करण्यात यावेत. हे थांब बंद असल्याने प्रवाशांना पुढील स्थानकात जाऊन पुन्हा माघारी यावे लागते. यामध्ये कुटुंबीयांचे हाल होतात, अशा तक्रारी आ. पाटील यांनी महाव्यवस्थापकांकडे केल्या.या सर्व तक्रारींचे लवकरच निराकरण केले जाईल. असे आश्वासन महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांनी आ. पाटील यांना दिले.
पाणी प्रश्न
दिव पूर्व भागातून दिवा पश्चिम भागात ठाणे पालिकेला जलवाहिनी टाकण्यासाठी रेल्वे मार्गा खालून पुशथ्रू बोगद्याची आखणी करण्यात आली आहे. पश्चिम भागात वाढत्या वस्तीच्या प्रमाणात मुबलक पाणी नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पुश थ्रू बोगद्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाने तातडीने परवानगी देऊन रखडलेला पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.
गणपतीसाठी विशेष एक्सप्रेस
मुंबई, ठाणे परिसरातील बहुतांशी कोकणातील रहिवासी दिवा रेल्वे स्थानकातून गणेशोत्सव काळात आपल्या गावी जातो. दिवा स्थानकातून कोकणात जाण्यासाठी अधिकाधिक एक्सप्रेस, पॅसेंजर सोडण्यात याव्यात. प्रवाशांना मुंबई, ठाणे, पनवेल येथे जावे लागणार नाही असे नियोजन करुन या गाड्या सोडाव्यात अशी सूचना आ. पाटील यांनी केली. गणेशोत्सवाच्या किमान दोन महिने अगोदर रेल्वेने दिवा स्थानकातून कोकणात किती एक्सप्रेस, पॅसेंजर सोडण्यात येणार आहेत याची घोषणा करावी. ज्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही. गेल्या काही वर्षात गणपती उत्सवाच्या काही दिवस अगोदर रेल्वेकडून दिवा स्थानकातून किती गाड्या सोडण्यात येणार याची घोषणा केली जाते. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. आरक्षण करताना तारांबळ उडते, असे आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक लाहोटी यांनी आ. पाटील यांना दिले.
या भेटीच्यावेळी मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील, रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख उपस्थित होते.