ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदिप या निवासस्थान परिसरात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकरीता नितीन उड्डाणपुलाखाली विश्रामगृह तसेच स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. या संबंधीच्या कामाची निविदा ठाणे महापालिका प्रशासनाने काढली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांची होणारी गैरसोय दूर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
राज्यात साडेतीन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले. मंत्रिमंडळ विस्तार करत नवनियुक्त मंत्र्यांना मंत्रालयाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शासकीय निवसस्थानाचेही वाटप करण्यात आले. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा या शासकीय निवासस्थानी अद्याप रहायला गेले नसून त्यांनी त्यांच्या ठाण्यातील लुईसवाडी भागातील शुभदीप या निवासस्थानी राहण्यास पसंती दिली आहे. अतिमहत्वाचे व्यक्ती म्हणून मुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात येते. त्यांच्या निवासस्थान परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला जातो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षा पुरविण्यात आली असून त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात पोलिसांनी सुरक्षेचे कवच उभे केले आहे.
हेही वाचा : डोंबिवलीत मिनी बसने रिक्षा, दुचाकीला दिली धडक; तीन विद्यार्थी जखमी
या पोलीस कर्मचाऱ्यांकरीता परिसरात स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्याची गैरसोय होत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांकरीता नितीन उड्डाणपुलाखाली विश्रामगृह तसेच स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासंबंधीची निविदा ठाणे महापालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. १९ ऑक्टोबर पर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत असून २१ ऑक्टोबरला प्राप्त निविदांचे लिफाफे उघडण्यात येणार आहेत. ज्या निविदाकारांवर काळ्या यादीत टाकण्याची अथवा नोंदणी रद्द करण्याची कोणतीही कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच प्रस्तावित अथवा सुरु आहे अशा निविदाकारांना या निविदेच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अशी अट निविदा स्पर्धेच्या पात्रतेमध्ये घालण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.