किन्नरी जाधव

अभयारण्याचा दर्जा मिळाल्याने खासगी बोटफेरीला मनाई; स्थानिक कोळय़ांचा हिरमोड

खाडीकिनारच्या जैवविविधतेचा अनुभव पर्यटकांना देण्यासाठी गेली काही वर्षे ठाणे आणि भांडूप खाडीकिनारी स्थानिक कोळ्यांमार्फत सुरू असलेल्या खासगी बोट सफरीला कांदळवन विभागाने लाल बावटा दाखविला आहे. ठाणे खाडीला पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला असून विशेषत फ्लेिमगो पक्ष्यांना अशा बोट सफरींचा त्रास होऊ शकतो, असे कारण देत ही खासगी बोट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे परिसराचे खाडीवैभव पाहण्यासाठी आतुर असलेल्या पर्यटकांना ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रातील बोटसेवेची मदत घ्यावी लागणार आहे.

‘पार्टिसिपेटरी ईको टुरिझम प्लॅन रुल्स अँड रेग्युलेशन’ या योजनेच्या अंतर्गत केवळ वन विभागाची बोटसेवा सुरू असून इतर ठिकाणी असलेल्या स्थानिक कोळय़ांना बोटसेवा चालवण्यास कांदळवन विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे खाडी पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारावर या कोळय़ांना पाणी सोडावे लागत आहे. बोट चालवण्याचा परवाना नसल्याने कांदळवन विभागाकडून परवानगी नाकारत असल्याचा खुलासा करण्यात आला असला, तरी काही कोळ्यांनी परवाना घेऊनही अद्याप कांदळवन विभागाकडून बोट सफरीची परवानगी नाकारण्यात आली आहे.

खाडीकिनारी पक्षी निरीक्षणासाठी पर्यटक, पक्षी अभ्यासकांचा ओढा वाढत असल्यामुळे स्थानिक कोळ्यांनी आपल्या बोटीच्या माध्यमातून खाडी सफर सुरू केल्याने ऑक्टोबर महिन्यापासून या खाडी सफरीसाठी पर्यटक गर्दी करत होते. ठाणे, भांडूप खाडीकिनारी ही बोट सफर सुरू होती. असे असताना या वर्षी ठाणे खाडीचा समावेश फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यात करण्यात आल्याने खासगी बोटचालकांना कांदळवन विभागाने बोट चालवण्यास परवानगी नाकारली आहे. या खाडीला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य घोषित करून दोन वर्षे उलटल्यानंतर या वर्षीच बोट परवानगी नाकारण्याचे कारण स्पष्ट होत नसल्याने स्थानिक कोळ्यांमध्ये नाराजी आहे. पक्षी अभयारण्य घोषित केल्यामुळे पक्ष्यांना त्रास होऊ नये यासाठी बोट सफरी नाकारण्यात आल्याचा दावा वन विभागातर्फे करण्यात येत असला तरी ऐरोली येथील किनारी सागरी जैवविविधता केंद्राला भेट देऊन नागरिकांनी केवळ वन विभागाच्या बोट सफरीचा उपयोग करावा यासाठी कांदळवन विभागाने सोयीस्कर निर्णय घेतला असल्याचा आरोप स्थानिक कोळ्यांकडून करण्यात येत आहे.

ठाणे आणि भांडूप खाडी किनारी व्यवसाय करणाऱ्या कोळ्यांना खाडी पर्यटनासाठी परवानगी हवी असल्यास एक समिती स्थापन करून त्यांच्या चार ते पाच बोटींपैकी खाडी पर्यटनासाठी केवळ दोनच बोटी वापरण्याच्या सूचना वनविभागातर्फे कोळ्यांना करण्यात आल्या आहेत. या दोन बोटींमधून मिळणारे उत्पन्न कोळ्यांनी आपापसात वाटून घेण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत, असे येथील कोळ्यांनी यांनी सांगितले.

५० हजारांच्या कमाईवर पाणी

ठाणे खाडीजवळ फ्लेमिंगो आणि स्थलांतरित पक्ष्यांचे थवे दाखल होत असल्याने दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पर्यटक या बोट सफारीला गर्दी करत होते. फ्लेमिंगो आणि रशिया, आफ्रिका अशा ठिकाणाहून येणारे पक्षी न्याहाळण्यासाठी येथील स्थानिक कोळी पर्यटकांना घेऊन जात होते. ऑक्टोबर ते जून महिन्यापर्यंत दर महिन्याला या पर्यटनातून प्रत्येक कोळ्याला मासिक ५० ते ६० हजार रुपये एवढे उत्पन्न मिळत होते, असे भांडूप येथील स्थानिक कोळी राजेश कोळी यांनी सांगितले.

परवाना असल्यास खाडीकिनारी बोट सफर ते करू शकतात. फ्लेमिंगो सँक्च्युरी जाहीर झालेल्या जागेत बोट सफर करायची असल्यास कांदळवन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

– मयूर बोथे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग

Story img Loader