ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग
पूर्वा साडविलकर
ठाणे : करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतरच्या र्निबधांतही शाळा, महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. करोनामुळे मागील वर्षभर विविध कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. अजूनही शाळा, महाविद्यालये प्रत्यक्षरीत्या भरविण्यात येणार नसल्याने अनेक शाळा आणि महाविद्यालय प्रशासनांनी हे उपक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्याचे ठरविले आहे.
ऑनलाइन अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांना घरबसल्या विविध विषयांची माहिती मिळावी, विद्यार्थ्यांचे मन रमावे यासाठी विविध उपक्रमांची पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात येत असल्याचे महाविद्यालये प्रशासनांकडून सांगण्यात आले आहे.
प्रदीर्घ काळाच्या टाळेबंदीत शाळा महाविद्यालये बंद होती. कालांतराने ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करण्यास परवानगी मिळाली. दरवर्षी शाळेत होत असलेले विविध उपक्रम कसे आयोजित करायचे, सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमांमध्ये कसे सहभागी करून घ्यायचे असा पेच शिक्षकांसमोर निर्माण झाला होता. करोना प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीही विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष हे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही व्याख्यानमाला, विविध स्पर्धा तसेच इतर उपक्रम यंदा ऑनलाइनच्या माध्यमातून कशा पद्धतीने घेता येतील याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच इतर शहरांतील शिक्षकांनी तसेच प्राध्यापकांनी या उपक्रमांना सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या योग दिनानिमित्त कल्याणमधील नूतन विद्यालयाने शाळेच्या आवारात मोजक्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत योग दिन साजरा केला होता. तर, ठाण्यातील ज्ञानगंगा महाविद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळच्या परिसरात वृक्षारोपण करण्यास सांगितले. या वृक्षांची देखभाल करतानाचा व्हिडीओ दररोज महाविद्यालयातील व्हॉट्सअॅप समूहावर पाठविण्यास विद्यार्थ्यांना सांगितले आहे. तसेच दिवसांत ऑनलाइन पद्धतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी पोस्टर मेकिंग, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
इंटरनेटचा अडथळा
शैक्षणिक अभ्यासक्रमासह ऑनलाइन होत असलेल्या या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे सर्वात मोठे आव्हान शिक्षक वर्गासमोर आहे. अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या अडथळ्यामुळे कार्यक्रम अर्धवट सोडावा लागतो. या विद्यार्थ्यांना संपूर्ण कार्यक्रम पाहता यावा यासाठी शाळा किंवा महाविद्यालयाच्या यूटय़ूब वाहिनीवर चित्रित केलेला कार्यक्रम समाविष्ट केला जातो. त्यानुसार, विद्यार्थ्यांना जसे शक्य होईल तसे ते कार्यक्रम पाहतात.
गेल्या वर्षी करोनामुळे विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक वर्षे वाया गेले. त्यानंतर, वार्षिक वर्षांत ऑनलाइनचा पर्याय निवडून शिक्षण सुरू करण्यात आले. त्यामुळे या वर्षांत विद्यार्थ्यांचे इतर उपक्रम घेणे शक्य झाले नव्हते. परंतु, यंदाच्या वर्षी शैक्षणिक अभ्यासक्रमासह इतर उपक्रम राबविण्याचेही आमचे प्रयत्न आहेत. यासाठी सर्व शिक्षकांनी नियोजन सुरू केले आहे.
– संपदा मावळंकर, सहायक प्राध्यापक, ज्ञानगंगा महाविद्यालय, ठाणे