डोंबिवलीत फेरीवाल्यांचा पालिकेला इशारा; हप्ते उकळणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर खेचण्याची मागणी

पालिकेने फेरीवाल्यांविरोधातील कारवाई जोरदारपणे सुरू केल्याने संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी मंगळवारी डोंबिवलीत सभा घेऊन यापुढे फेरीवाल्यांना मारहाण झाली तर त्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी नगरसेवक, पालिका कर्मचारी, आयुक्त यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले.

कष्ट करून आम्ही आमचा व्यवसाय रीतसरपणे करीत आहोत. आम्ही कोणतीही लूटमार करीत नाही. तरीही आमच्यावर कारवाई करून आम्हाला बेदखल केले जात आहे. आमच्यासाठी पालिका प्रशासन कोणतेही धोरण राबवीत नाही. उलट आमचे रोजगाराचे साधन हिसकावून घेत आहे. पालिकेला आमच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. रोजगाराची साधने नाहीत. त्यात तरुणांना रस्त्यावर आणून प्रशासनाला काय मिळत आहे. पालिका अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक आमच्याकडून राजरोस हप्ते घेत आहेत. हे हप्ते अगदी वपर्यंत पोहचविले जातात. मग ते हप्ते घेताना लाज कशी वाटली नाही. आता वर पुन्हा आमच्यावर कारवाई केली जात आहे, हे योग्य आहे का, असे प्रश्न कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता संघटनेचे प्रशांत सरखोत यांनी सभेत उपस्थित केले.

आम्हाला मारहाण करणाऱ्यांनी किती जणांना अगोदर रोजगार दिला ते स्पष्ट करावे. भय्या आणि मराठी वाद उकरून काढून काही जण पोळी भाजून घेत आहेत. हिंमत असेल तर फेरीवाल्यांप्रमाणे बेकायदा बांधकामे हटविण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान शिवगर्जना संघटनेचे भाऊ पाटील यांनी दिले.

आमच्या हप्तेखोरीवर हे सगळे  माजले आहेत. तेच आमच्यावर आता उलटले आहेत. ही हिटलरशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा फेरीवाल्यांतर्फे पालिकेला देण्यात आला. फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच ठेवली तर यापुढे फेरीवाला कोणालाच मतदान करणार नाही. फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री का मूग गिळून बसले आहेत, असा प्रश्न सरखोत यांनी केला.

फेरीवाला महिलेची आत्महत्येची धमकी

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर बसून भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका फेरीवाला महिलेने ‘भाजी विक्रीच्या टोपलीला हात लावलात तर आत्महत्या करीन’ अशी धमकी दिली. आत्महत्या करण्यापूर्वी मी एक चिठ्ठी लिहून ठेवीन, त्यात तुमची (कामगार) नावे लिहीन, अशी धमकी फेरीवाला महिलेने दिल्याने रामनगर पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

 

रविवारी रात्री डोंबिवली पूर्व भागात फेरीवाला हटाव पथक प्रमुख विजय भांबरे पथकासह फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करीत होते. स्कायवॉकवर कविता संतोष गायकवाड (रा. इंदिरानगर, प्लाझमा ब्लड बँकेसमोर, डोंबिवली) ही महिला टोपलीत भाजी विक्री करीत होती. पथकातील कामगार गणेश माने, विलास शिंदे यांनी त्या महिलेला तेथून जाण्यास सांगितले. त्यावर संबंधित महिलेने आक्रमक भूमिका घेत कामगारांना शिवीगाळ सुरू केली. यावेळी सोबत पोलीस होते. तरीही महिला शिवीगाळ करून कामगारांना मारहाण करण्यास धावली. भांबरे व पोलिसांनी तिला शांत राहण्याचा व अन्यत्र जाण्याचा सल्ला दिला. त्यावर कविता हिने आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे तिला पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्यात नेले. तेथे तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या फेरीवाला पथकावर नियंत्रक म्हणून उपअभियंता अनंत मादगुंडी कार्यरत होते. पण हा प्रकार घडताच मादगुंडी यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते. तेथून ते महापालिकेच्या डोंबिवली कार्यालयात येऊन बसले. यामुळे फेरिवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

आयुक्त पी. वेलरासू यांनी रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटविण्यासाठी महापालिकेतील अभियंते, उपायुक्त दर्जाचे अधिकारी यांना रेल्वे स्थानक भागात तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपासून नियंत्रक अधिकारी कल्याणहून डोंबिवलीत वातानुकूलित वाहनातून येतात. स्थानिक अधिकाऱ्यांना आल्याचे भासवतात. प्रत्यक्षात फेरीवाला हटाव पथकाबरोबर रेल्वे स्थानक भागात जात नाहीत, अशा तक्रारी आहेत. आयुक्तांच्या आदेशाला नियंत्रक अधिकाऱ्यांकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader